‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !
कोलकाता (बंगाल) – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) प्रदर्शित झाला आहे. यात एका प्रसंगामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यवीर सावरकर ‘जर्मनी आणि जपान यांच्या अत्याधुनिक शस्त्रांद्वारे इंग्रजांवर आक्रमण करा’, असे सांगतांना दिसत आहेत. या प्रसंगावरून नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी टीका केली आहे. त्यांनी नेताजी बोस यांना ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणत ‘सावरकरांसमवेत त्यांना जोडू नये’, असे म्हटले आहे. हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
१. चंद्र कुमार बोस यांनी ‘एक्स’वर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते राणदीप हुडा यांना ‘टॅग’ (उद्देशून) करत केलेल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे की, रणदीप हुड्डा, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या तुमच्या चित्रपटाचे मी कौतुक करतो; पण योग्य व्यक्तिमत्त्व दाखवणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. कृपया सावरकरांसमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते होते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.
Mr. @RandeepHooda – please don’t distort history! pic.twitter.com/5u5hK66eiA
— Chandra Kumar Bose (@Chandrakbose) March 6, 2024
२. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर (छोटे विज्ञापन) प्रदर्शित झाला. तेव्हाही त्यावरून वाद निर्माण झाला होता. टीझरमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे भगतसिंह, खुदीराम बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान होते’, असे म्हटले होते. त्यावरून टीका करण्यात आली होती. त्या वेळीही चंद्र कुमार बोस यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते की, सावरकरांवर बनवलेल्या चित्रपटात नेताजी, भगतसिंह आणि खुदीराम बोस यांना दाखवण्याची आवश्यकता नाही. (जो इतिहास आहे, तोच जर दाखवायचा नसेल, तर चित्रपटाला काय अर्थ आहे ? अशा प्रकारचा आक्षेप घेणारे नेताजी बोस यांचाच अवमान करत आहेत, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक) चित्रपटाचा आशय वादग्रस्त आहे कि नाही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
संपादकीय भूमिका
|