Allahabad HC Hindu Marriage Act : प्रेमविवाहामुळे वाढणार्‍या वादामुळे हिंदु विवाह कायद्यात पालट करायला हवा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – आज जितक्या सहजतेने प्रेमविवाह होत आहेत, तितक्याच गतीने जोडप्यात वादही निर्माण होत आहेत. हे पहाता हिंदु विवाह कायद्यात पालट करायला हवेत, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रेमविवाह केलेल्या जोडप्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात पतीच्या बाजूने निकाल देतांना व्यक्त केले. सध्या हिंदु विवाह कायद्यानुसार घटस्फोटाची मागणी करणार्‍या जोडप्याला घटस्फोटाची याचिका प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर ६ मास एकत्र रहावे लागते.

न्यायलयाने म्हटले की, हिंदु विवाह कायदा वर्ष १९५५ मध्ये करण्यात आला होता. त्या वेळी वैवाहिक नात्यातील भावना आणि आदराची पातळी वेगळी होती. तेव्हा आजच्यासारखी लग्ने होत नव्हती. आता शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, जातीय अडथळे तोडणे, आधुनिकीकरण आणि पाश्‍चात्त्य संस्कृती यांच्या प्रभावामुळे विवाहसंस्थेत अनेक पालट झाले आहेत. खरे तर समाज अधिक मुक्त आणि व्यक्तीवादी बनला आहे. यात भावनिक आधाराला अधिक जागा नाही.

संपादकीय भूमिका

प्रेमविवाह असो कि ठरवून केलेले विवाह असतो, प्रारब्धानुसार जे भोगायचे आहे, ते भोगावेच लागते, असे धर्मशास्त्र आहे. त्यातही प्रेमविवाह करतांना कुंडली पहाणे, एकमेकांचे गुण-दोष लक्षात घेणे, तडजोड करण्याची मानसिकता ठेवणे आदी गोष्टींचाही विचार होणे आवश्यक आहे !