Google Restored Indian Apps : भारत सरकारच्या तंबीनंतर गूगलने ‘प्ले स्टोअर’वरून हटवलेले भारतीय आस्थापनांचे १० अ‍ॅप पुन्हा कार्यान्वित !

केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव

नवी देहली – केंद्र सरकारच्या आक्षेपानंतर गुगलने १ मार्च या दिवशी ‘प्ले स्टोअर’वरून काढून टाकण्यात आलेले भारतीय आस्थापनांचे १० अ‍ॅप्स पुन्हा कार्यान्वित केले.

१. या संदर्भात केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव म्हणाले होते की, ‘इन अ‍ॅप पेमेंट’च्या संदर्भात गूगलला भारतीय अ‍ॅप्स हटवण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. वाद सोडवण्यासाठी गूगल आणि स्टार्टअप (नवीन उद्योगव्यवसाय चालू करणारे) यांच्या प्रतिनिधींना ‘प्ले स्टोअर’वरून हटवल्या जाणार्‍या अ‍ॅप्सशी संबंधित पुढील आठवड्यात बैठक बोलावण्यात आली आहे.

२. अ‍ॅप देयक धोरणांचा हवाला देत गूगलने १ मार्च या दिवशी हे अ‍ॅप्स हटवले होते.  गूगलने सांगितले होते की, जे अ‍ॅप्स काढून टाकण्यात आले त्यांना ३ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता; पण त्यांनी आमचे धोरण स्वीकारण्यास नकार दिला.

३. या विषयी केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, भारताचे धोरण अगदी स्पष्ट आहे. आमच्या स्टार्टअपना त्यांना आवश्यक असलेले संरक्षण मिळेल. मला आशा आहे की, गूगल त्याचा विचार करील. आमच्याकडे वाढणारी स्टार्टअप योजना आहे आणि तिच्या हितांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

४. गूगल अ‍ॅप्सवर ११ टक्के ते २६ टक्के शुल्क आकारते, ज्याचा भारतीय स्टार्टअप विरोध करत आहेत. १५ टक्के ते ३० टक्के असणारी पूर्वीची शुल्क संरचना रहित करण्याच्या  प्राधिकरणाच्या आदेशानंतर गूगलने हे शुल्क लागू केले आहे.

५. अनेक आस्थापनांनी गूगलविरुद्ध शुल्कावरून तक्रारी केल्या होत्या. भारतीय स्पर्धा आयोगाने गेल्या वर्षी मे महिन्यात याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते.

६. गूगलने भारत मॅट्रोमोनी, शादी डॉट कॉम, नौकरी डॉट कॉम, ९९ एकर्स डॉट कॉम, अल्ट, स्टेज, अहा, टुली मॅडली, कुकू एफ्एम्, क्विक आणि एफआरएनडी हे अ‍ॅप हटवले होते.