म्हापसा, २८ फेब्रुवारी (वार्ता.) : येथील प्रसिद्ध श्री बोडगेश्वर मंदिरात २८ फेब्रुवारीच्या पहाटे ४.३० वाजता चोरट्यांनी देवाच्या पादुकांची पेटी फोडली. म्हापसा पोलिसांनी अन्वेषण करून काही घंट्यांमध्येच संशयित सागर शिंदे (वय ४० वर्षे) आणि आनंद नाईक (वय ४० वर्षे) या मूळच्या कर्नाटक येथील संशयितांना कह्यात घेतले आहे.
२८ फेब्रुवारीला पहाटे सुरक्षारक्षक मंदिरात झोपलेला असतांना २ चोरटे मंदिर परिसरात शिरले. (रात्री मंदिरांची राखण करायची सोडून झोपलेल्या सुरक्षारक्षकांवरच कारवाई व्हायला हवी ! – संपादक) चोरट्यांनी देवाच्या समोर ठेवलेली पादुकांची काचेची पेटी फोडली.काचेच्या पेटीत ठेवलेल्या या पादुकांवर भाविक देणगी म्हणून पैसे अर्पण करत असतात.
(सौजन्य : Prudent Media Goa)
चोरट्यांनी या काचेवर दांडा मारला. या वेळी झालेल्या आवाजामुळे या परिसरात झोपलेल्या एका हमाली मजुराला जाग आली. त्याने सतर्कपणे झोपलेल्या सुरक्षारक्षकाला जागे केले. याच वेळी मंदिराच्या दीपस्तंभाजवळ झोपलेले अन्य काही जणही जागे झाले. या गोंधळात चोरट्यांनी दांडा तेथेच ठेवून शक्य तितक्या नोटा उचलून मंदिराच्या उजव्या बाजूने पलायन केले. या घटनेची माहिती सुरक्षारक्षकाने देवस्थान समितीला दिली आणि त्यानंतर याविषयी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी गतीने अन्वेषण करून चोरट्यांना गजाआड केले.
संपादकीय भूमिकाहिंदूंची असुरक्षित मंदिरे ! |