नामजप अखंड होत असल्याने ‘स्वतः चैतन्याच्या अखंड स्रोतात असून ‘स्वतःच्या सर्व कृती ईश्वरच करत आहे’, असे अनुभवणारे देवद (पनवेल) येथील होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ६८ वर्षे)!

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना येत असलेल्या नामजपाबद्दलच्या अनुभूती आतापर्यंत कुणालाच काय; पण मलाही आलेल्या नाहीत. याबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२१.२.२०२४)

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

‘वर्ष १९९८ मध्ये मी प.पू. डॉक्टरांच्या महाड येथील सभेला गेलो होतो. तिथे आम्हा उभयतांची (मी आणि पत्नी) प.पू. डॉक्टरांशी भेट झाली आणि आमची साधनेची वाटचाल चालू झाली.

१. सनातनचा ‘नामसंकीर्तनयोग व मंत्रयोग’ हा ग्रंथ वाचून नाम श्वासाला जोडण्याचा प्रयत्न होणे आणि गुरुकृपेने नामजप श्वासाला जोडला जाणे

सनातनचा ‘नामसंकीर्तनयोग व मंत्रयोग’ हा ग्रंथ वाचल्यावर माझ्या लक्षात आले, ‘आपले नाम २४ घंटे झाले पाहिजे आणि त्यासाठी ते श्वासाला जोडले पाहिजे, तरच आपण अखंड अनुसंधानात राहू शकतो.’ त्यानंतर मी नाम श्वासाला जोडण्याचा प्रयत्न सतत करू लागलो. साधारण २ वर्षे मी झोपेतही तसा प्रयत्न करत होतो. मी २ वर्षे सतत जागा राहून नाम श्वासाला जोडण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नांनंतर गुरुकृपेने माझा नामजप श्वासाला जोडला गेला. नंतर ‘प्रत्येक कृती करतांना माझा नामजप श्वासाच्या समवेत चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले.

२. नामजप अखंड होऊ लागल्यावर आलेल्या अनुभूती

२ अ. ‘मूलाधारचक्रापासून सहस्रारापर्यंत प्रत्येक चक्र उघडत आहे’, असे जाणवणे : काही दिवसांनंतर ‘मूलाधारचक्रापासून सहस्रारापर्यंत एक एक चक्र उघडले जात आहे’, असे मला जाणवू लागले. चक्र उघडतांना मला त्या चक्राजवळ विशिष्ट संवेदना जाणवत असत. त्यामुळे ‘ते चक्र उघडत आहे’, असे माझ्या लक्षात येत होते.

२ आ. ‘शरिरातील पेशी अन् पेशी नाम घेत असून स्वतः चैतन्याच्या धबधब्याखाली उभा आहे’, असे जाणवणे : माझ्या नामाचा प्रवास सहस्रारापर्यंत झाल्यानंतर मला ‘सहस्रारामधून चैतन्याचा स्रोत माझ्या शरिरामध्ये जात आहे’, असे जाणवले. माझ्या शरिरातील प्रत्येक पेशी अन् पेशी नाम घेत असून काही वेळा मला ‘मी चैतन्याच्या धबधब्याखाली उभा आहे’, असे वाटते आणि मी एक वेगळीच अवस्था अनुभवतो.

२ इ. सहस्रारचक्रामधून चैतन्याचा स्रोत शरिरामध्ये जाऊन सुषुम्ना नाडी चालू होणे, तेव्हा ध्यानावस्थेत गेल्यामुळे स्वतःचे अस्तित्व न जाणवणे आणि एक वेगळीच आनंदावस्था अनुभवणे : मी शांत बसल्यावर अकस्मात् माझ्या सहस्रारचक्रामधून चैतन्याचा स्त्रोत माझ्या शरिरामध्ये जाऊन माझी सुषुम्ना नाडी चालू होते आणि मी ध्यानावस्थेत जातो. तेव्हा मला ‘मी वातावरणाशी एकरूप झालो असून ‘मी आणि चैतन्य एकच आहे’, अशी अनुभूती येते. ‘माझे अस्तित्व नाही’, असे जाणवून मी एक वेगळीच आनंदावस्था अनुभवतो. ‘त्या अवस्थेमधून कधीच बाहेर येऊ नये किंवा त्यातून कुणी मला जागे करू नये’, असे मला वाटते. कुणी जागे केले, तर मला त्या व्यक्तीचा राग येतो. डोळे मिटून बसल्यावर मला अशा प्रकारची अनुभूती वारंवार येते. मी ६० ते ७० वेळा अशी अनुभूती घेतली आहे.

२ ई. ‘नाम सहजावस्थेमध्ये होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यामुळे सहजावस्था निर्माण होणे : त्यानंतर मी ‘माझे नाम सहजावस्थेमध्ये होऊ दे’, अशी प्रार्थना करायला आरंभ केला. त्यानंतर काही दिवसांनी माझा ‘नामजप सहजपणे होत असून मी काही न करता माझा नामजप सतत चालू आहे’, अशी जाणीव मला होऊ लागली. माझ्या सहस्रार आणि आज्ञा या चक्रांच्या ठिकाणी मला सतत संवेदना जाणवतात. त्यामुळे मी एक प्रकारची शांतता सतत अनुभवतो.

२ उ. ‘नामाच्या चैतन्याचा स्रोत सतत रक्षण करत आहे’, अशी अनुभूती येणे : ‘नामाच्या चैतन्याचा हा स्रोत माझे सतत रक्षण करत आहे’, असे मला जाणवते. एखाद्या त्रास असणार्‍या ठिकाणी गेल्यावर चैतन्याचा हा प्रवाह माझ्या सहस्रारामधून गतीने माझ्या शरिरामध्ये जातो आणि ‘मी पूर्णपणे चैतन्यामध्ये न्हाऊन निघतो’, असे मला जाणवते. पुढे एखादी गंभीर घटना घडणार असेल, तर १ – २ दिवस आधी ‘या चैतन्यामध्ये वाढ होते’, असे मला जाणवते. त्यामुळे ‘पुढे काहीतरी घडणार आहे’, हे माझ्या लक्षात येऊन प्रत्यक्ष प्रसंग घडत असतांना मला शांत रहाता येते.

काही वेळा सेवा करतांना चैतन्य एवढे वाढते की, मला सेवा करणे शक्य होत नाही आणि मला काहीवेळ डोळे मिटून बसावे लागते. अशा वेळी प्रार्थना करून मला त्या अवस्थेमधून बाहेर पडावे लागते.

३. सर्व कृती ईश्वर करत असल्याविषयी आलेल्या अनुभूती

३ अ. आता नामात कुठलेही शब्द नसल्याने ‘अंतरात काहीतरी चालू असून स्वतः त्या चैतन्याशी जोडला गेलो आहे’, असे जाणवणे : आता नामात कुठलेही शब्द नसतात. ‘आत काहीतरी चालले असून मी त्या चैतन्याशी जोडला गेलो आहे’, असे मला जाणवते. ‘प्रार्थना, कृतज्ञता शब्दांमध्ये व्यक्त करणे किंवा भावप्रयोग करणे’, असे होत नाही. मला ‘मी सतत अनुसंधानात आहे’, असे जाणवून ‘वेगळे काही न करता केवळ त्या स्पंदनांकडे लक्ष द्यावे’, असे वाटते. ‘सर्व काही ईश्वरच करत आहे. मी नाम घेत नसून तो माझ्याकडून नाम करून घेत आहे’, असे मला जाणवते.

३ आ. गतीने नामजप होणे : कोरोना काळामध्ये मी जवळजवळ २ वर्षे घरीच होतो. मी घरी असतांना ज्या ठिकाणी बसून सेवा करत असे, त्या ठिकाणी बसल्यावर लगेच ‘आतून गतीने नामजप चालू होऊन मन पूर्णपणे निर्विचार होते’, असे माझ्या लक्षात आले.

३ इ. रुग्णांना औषध द्यायच्या वेळी ईश्वर मला औषधे सुचवतो आणि मी ती रुग्णांना देतो. ‘सर्वकाही तोच करत असून मी केवळ माध्यम आहे’, असे आता मला वाटते.

४. घरामध्ये झालेला सात्त्विक पालट

अ. घरामध्ये मला एक प्रकारची शांतता जाणवते.

आ. आमच्या शयनकक्षाच्या दाराच्या काचा पारदर्शक झाल्या आहेत. त्यामुळे ३ – ४ वेळा माझे डोके त्या काचेवर आपटले.

इ. घरातील लाद्या गुळगुळीत झाल्या असून त्यावरून ‘घसरून पडू की काय ?’, अशी मला भीती वाटते.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘या सर्व अनुभूती देऊन देवाने मला कृतकृत्य केले’, यासाठी मी ईश्वरचरणी कृतज्ञ आहे. ईश्वराने मला असेच अखंड अनुसंधानामध्ये ठेवून ‘माझा कर्तेपणा पूर्णपणे  नष्ट करावा’, अशी त्याच्या चरणी  प्रार्थना !’

– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक