अमेरिका आणि ब्रिटन यांसह ८ देशांनी येमेनमधील हुती आतंकवाद्यांच्या १८ ठिकाणांवर केले आक्रमण !

हुती आतंकवाद्यांकडून विविध देशांच्या व्यापारी जहाजांवर चालू असलेल्या आक्रमणांवर आळा घालण्यासाठी झाली संयुक्त कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

सना (येमेन) – हुती आतंकवादी गेल्या काही आठवड्यांपासून आखाती देशांच्या जवळ असलेल्या समुद्रात सातत्याने विविध देशांच्या व्यापारी नौकांवर आक्रमणे करत आहेत. यावर आळा घालण्यासाठी अमेरिका-ब्रिटनसह ८ देशांच्या सैन्याने हुती आतंकवाद्यांच्या विरोधात संयुक्तपणे कारवाई केली. ‘यू.एस्. सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार येमेनची राजधानी साना येथील हुती आतंकवाद्यांच्या १८ ठिकाणांना या वेळी लक्ष्य करण्यात आले.

१. ब्रिटीश आणि अमेरिकी सैन्यांसह ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड्स अन् न्यूझीलंड यांच्या सैन्यांनीही संयुक्तपणे या कारवाईत सहभाग घेतला.

२. हुती आतंकवाद्यांच्या आक्रमणांमुळे जागतिक व्यापार विस्कळीत झाला असून जलवाहतुकीचे दरही वाढले आहेत. हुती आतंकवादी येमेनचे साहाय्य घेऊन येणार्‍या जहाजांवरही आक्रमणे करत आहेत. त्यामुळे जहाजासह साहाय्याच्या सामानाचीही हानी होत आहे. त्यामुळे ८ देशांनी मिळून या हुती आतंकवाद्यांच्या कारवायांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला.

३. येमेनी गृहयुद्धानंतर येमेनमधील वाढत्या सौदी अरेबियाच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी वर्ष १९९० च्या दशकाच्या आरंभी हुती चळवळीची स्थापना झाली. हा गट झैदी-शिया अल्पसंख्यांकांचा सदस्य हुसेन बदरेद्दीन अल-हुती यांनी तयार केला होता.