चर्चमध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी !

अहिल्यानगर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी !

निवेदन देतांना डावीकडून रामेश्वर भुकन, उत्तमराव वाबळे आणि ऋषिकेश शेटे, मध्यभागी पोलीस अधीक्षक राकेश ओला, उजवीकडून सुमित वर्मा, कु. खोंडे, सौ. सुरेखा विददे, कु. प्रतीक्षा कोरगावकर

अहिल्यानगर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – सोनई येथे ‘बिनीयार्ड ब्लेरुड चर्च’ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २२ फेब्रुवारीला नगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने देण्यात आले. पास्टर सुनील गंगावणे, पास्टर (पास्टर म्हणजे पाद्री) उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तरी हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ अंतर्गत चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच हे प्रकरण स्थानिक न्यायालयात न घेता जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)

या वेळी भाजप प्रदेश सदस्य सौ. सुरेखा विद्ये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमितजी वर्मा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बापू ठाणगे, भाजपचे वसंत शेटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अक्षय शेटे, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर, श्री. रामेश्वर भुकन, श्री. हर्षद फुलारी आदी उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, तक्रार करणार्‍या मुलींच्या कुटुंबावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तक्रारदार आणि मुलीचा जबाब लवकरात लवकर घेऊन या घटनेला वाचा फोडणार्‍या अन् रंगेहात पकडून देणार्‍या युवकांना पोलीस संरक्षण द्यावे.