आदर्श शिवजयंती साजरी करणारे बोईसर येथील मुरबे गाव !

ऐतिहासिक, पारंपरिक, शौर्यपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी !

शिवजयंतीच्या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ

पालघर – छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोचावेत आणि हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने जिल्ह्यातील बोईसरमधील मुरबे गावात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व ग्रामस्थ मिळून मागील ५ वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करत आहेत. यावर्षीही येथे ऐतिहासिक, पारंपरिक आणि शौर्यपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.

१. प्रारंभी श्रीराममंदिरामध्ये महाराजांच्या पालखीचे पूजन आणि आरती करण्यात आली. पालखीचे पूजन सरपंच सौ. मोनालिसा तरे यांच्या हस्ते करण्यात आले.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मंदिराच्या आवारात फेरी काढण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची गारद (घोषणा) देण्यात आली. नंतर ‘महाराष्ट्र गीता’ने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

३. समितीच्या वतीने लाठी आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. गावातील युवक आणि युवती यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका सादर केली. यातून महाराजांचे बालपण, रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली शपथ, अफझलखान वध आणि आई भवानीमातेचा जाग-गोंधळ करून शिवराज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण करण्यात आले.

४. गावातील श्रीराममंदिर आवार, मच्छीमार सोसायटी, दवाखाना पाडा आणि भांडार आळी अशा एकूण ४ चौकांमध्ये महाराजांवर आधारित गीते, गारद, व्याख्यान, नाटिका आणि स्वसंरक्षण प्रात्यक्षिके असे सादरीकरण करण्यात आले.

५. कोणत्याही राजकीय पक्षांच्या साहाय्याविना गावातील सर्व ग्रामस्थ आणि शिव – शंभू भक्तांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शिवरायांप्रमाणे शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत होणे ही काळाची आवश्यकता  ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आताच्या काळातही आपल्या हिंदु महिलांची अब्रू लुटली जाते. प्राणघातक आक्रमणे होतात. या विरोधात प्रत्येक हिंदु युवक – युवती यांनी शास्त्र आणि शस्त्र शिकून शिवरायांचा आदर्श घेऊन स्वसंरक्षणार्थ सिद्ध व्हायला हवे. ही काळाची आवश्यकता आहे. पुढे ते म्हणाले की, शिवजयंती खर्‍या अर्थाने कशी साजरी करायला हवी, याचा आदर्श मुरबे गावाने सर्वांसमोर ठेवला आहे.

उत्सवात पालघर पंचायत समिती शिवसेना सदस्य श्री. जितेंद्र मेर, माजी पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिनभाऊ पाटील, माजी सरपंच डॉ. प्रज्ञा तरे, शिवसेना शाखाप्रमुख श्री. अनिल तरे, युवासेना अधिकारी श्री. अजिंक्य देव, शिवसेना कार्यकर्ते आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याविषयी सर्वश्री देवेंद्र देव, घनश्याम देव, नवीन मेहेर, चिराग चौधरी आणि समस्त शिव-शंभू भक्त यांचे विशेष आभार श्री. खानविलकर यांनी व्यक्त केले.


वैशिष्ट्यपूर्ण

१. प्रत्येक चौकात चहूबाजूंनी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

२. संपूर्ण फेरीतील गाणी, नाटिका, नृत्य यांचे सादरीकरण करणारे कलाकार गावातील होते.

संपादकीय भूमिका 

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्‍या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !