हिंदु जनजागृती समितीकडून वाराणसी आणि सैदपूर (उत्तरप्रदेश) येथील जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देत केली मागणी !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – अयोध्येत प्रभु श्रीराममंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर देशभरात कट्टरतावादी धर्मांधांकडून येनकेन प्रकारेण हिंदूंवर आक्रमणे करण्यात येणे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, देशविरोधी भावना निर्माण करणे आदी अवैध गंभीर कृत्ये केली जात आहेत. ‘इस्लामिक स्टेट’ आणि अन्य जिहादी आतंकवादी संघटनांनी अयोध्येचे श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचीही धमकी दिली आहे. अशा घटनांनी संपूर्ण देशात असंतोष आणि भीती यांचे वातावरण आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर तत्परतेने कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी अनेक रामभक्तांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी आणि सैदपूर येथील जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. वाराणसी येथे निवेदन देतांना वाराणसी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अजितसिंह बग्गा आणि अधिवक्ता मदन मोहन यादवही उपस्थित होते.
या वेळी ‘भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊन प्रक्षोभक बातम्या देणार्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करावी, सामाजिक माध्यमांवर हिंदूंच्या भावना दुखावणार्यांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांची सामाजिक माध्यमांवरील खातीही बंद करावीत’, अशा मागण्याही करण्यात आल्या.