NCSC : लोकांना पुष्कळ काही सांगायचे आहे; पण बोलू दिले जात नाही ! – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

  • बंगालच्या संदेशखाली येथील हिंदु महिलांवरील अत्याचारांचे प्रकरण

  • संदेशखालीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी !


कोलकाता (बंगाल)
– राज्यातील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात असलेल्या संदेशखाली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे पथक पोचले आहे. या पथकाने पीडितांची भेट घेतली असून ते राष्ट्रपतींना अहवाल सादर करणार आहे.


राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या अंजू बाला म्हणाल्या की, प्रशासनाने पीडितांची तक्रारही नोंदवून घेतली नाही. आजही महिलांच्या संदर्भात असे काही घडणे, ही लज्जास्पद घटना आहे. एखाद्याला (तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याला) कोणतीही स्त्री आवडली, तर तो तिला बळजोरीने घेऊन जायचा.

येथे राजकारण्यांकडून महिलांवर अत्याचार करून त्यांना वार्‍यावर सोडले जाते. यावरून येथे राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे, हे आपल्या लक्षात येते. असे राजकारण होऊ नये. संदेशखालीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी आमची इच्छा आहे; कारण येथील लोक अजिबात सुरक्षित नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या मनात ‘ममता’ नाही !

बाला पुढे म्हणाल्या की, बंगालच्या मुख्यमंत्री स्वतः एक महिला आहेत. त्यांचे नाव ममता आहे, पण त्यांच्या मनात ‘ममता’ असे काही नाही. त्या काहीही उघड करू इच्छित नाहीत. त्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात गुन्हा नोंद करत नाहीत. देश त्यांना क्षमा करणार नाही.

‘राज्य सरकार एकतर्फी कार्य करीत आहे’, यावर विश्‍वास बसत नाही ! – आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर म्हणाले, मला संदेशखालीचा अहवाल प्राप्त झाला आहे. पीडित महिला अनुसूचित जातीतील आहेत. त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी संपूर्ण आयोग बंगाल येथे गेला होता. या लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन मी राष्ट्रपतींना अहवाल देईन. लोकांच्या बोलण्यातून सत्य आणि असत्य समोर येईल. ‘राज्य सरकार एकतर्फी कार्य करत आहे’, यावर विश्‍वास बसत नाही. हा आयोग राजकीय नाही, तो घटनात्मक आहे. आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलो नाही, तर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आलो आहोत.

   

( सौजन्य : ZEE NEWS)


काय आहे प्रकरण ?

संदेशखालीमध्ये महिलांनी तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान आणि त्याचे समर्थक यांच्यावर लैंगिक छळ अन् भूमी बळकावल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक महिला आंदोलन करत आहेत. शेख शाहजहान याच्या अटकेची मागणी महिलांनी केली आहे. महिलांनी तृणमूल काँग्रेसचे दुसरे नेते शिवप्रसाद हाजरा यांचे शेत आणि शेतघर यांना आग लावली होती.

संपादकीय भूमिका 

  • एखाद्या घटनात्मक आयोगाकडून अशी मागणी होणे, हे गंभीर आहे. केवळ संदेशखाली येथेच नाही, तर संपूर्ण बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
  • अनुसूचित जाती-जमातींचे कथित कैवारी आता गप्प का ?