Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण १५ फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार !

काँग्रेसचे त्यागपत्र सादर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

मुंबई – काही दिवसांपासून ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील’, ही चालू असलेली चर्चा १२ फेब्रुवारी या दिवशी अंतिमतः सत्य ठरली. चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचे त्यागपत्र दिले आहे. तसे पत्रही त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे ‘माजी विधानसभा सदस्य’ असा उल्लेख आहे. ते १५ फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे काही वृत्त संकेतस्थळांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली होती. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचेही समजते.

‘२ दिवसांत मी राजकीय भूमिका घेईन. काँग्रसमध्ये मी प्रामाणिकपणे काम केले. कुणाहीविषयी माझ्या मनात काही नाही’, असे अशोक चव्हाण यांनी दुपारी माध्यमांच्या पत्रकारांना सांगितले.

१२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनाम्याची प्रक्रिया समजून घेतली. ‘मी पुन्हा येतो’ असे सांगून चव्हाण नार्वेकरांच्या कार्यालयातून ते निघून गेले. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देहलीला गेले आहेत. ११ फेबु्रवारी या दिवशी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित होते. चव्हाण यांना राज्यात मंत्रीपद देण्यास भाजपच्या नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

काँग्रेसमधील नेते संपर्कात ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षे वाटचाल करत आहे, त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची पक्षात घुसमट होत आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्‍चितच काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे वक्तव्य भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिलेल्या त्यागपत्राच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का ? – संजय राऊत, उबाठा गट

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत

‘अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्‍वास बसत नाही. कालपर्यंत ते आमच्या सोबत होते, तसेच आमच्याशी चर्चा करीत होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाणही आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का ? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार का ? आपल्या देशात काहीही घडू शकते ’, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये अस्वस्थता !

काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. अशोक चव्हाण यांच्यासह यांच्या स्वीय साहाय्यकांचाही संपर्क होत नाही. ‘मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे’, असे काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी म्हटले आहे. नांदेड, धाराशिव आणि पश्‍चीम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता, तर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.