नवी देहली – भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत येथील भारत मंडपममध्ये होणार आहे. बैठकीला भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्षांसह राष्ट्रीय परिषदेचे ८ सहस्र प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार परिषदेच्या बैठकीचे प्रमुख सूत्र श्रीकृष्णजन्मभूमीचा प्रस्ताव असू शकतो. ‘हा प्रस्ताव भाजपने थेट सादर करावा कि विहिंपसारख्या एखाद्या संघटनेच्या माध्यमातून आणायला पाहिजे ?’, यावरून सध्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा चालू आहे. भाजपच्या बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, भाजपने हा प्रस्ताव स्वत: सादर करावा आणि इतर संघटनांकडे यास पाठिंबा देण्याचा आग्रह धरावा.
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आम्ही श्रीराममंदिराचा प्रस्ताव आणला होता, तेव्हा स्थिती वेगळी होती. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो; म्हणून आम्हाला दीर्घ न्यायालयीन लढा द्यावा लागला. आता केंद्र आणि उत्तरप्रदेश दोन्ही ठिकाणी आम्ही सत्तेत आहोत. आम्ही मुसलमान पक्षांशी चर्चा करूनच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. उत्तरप्रदेश सरकार जन्मभूमीविषयी कायदाही करू शकतो. न्यायालयामध्ये जाण्याचा पर्याय सर्वांत शेवटचा असेल.