लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. ५ फेब्रुवारी या दिवशी हा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला.
धार्मिक शहरांवर लक्ष
खन्ना म्हणाले की, श्री काशी विश्वनाथ मंदिर ते गंगा नदीपर्यंतच्या मार्गाचा विस्तार आणि सुशोभीकरण केल्यानंतर भाविकांच्या संख्येत ४ ते ५ पट वाढ झाली आहे. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगाने पर्यटक आणि भाविक यांच्या संख्येत संभाव्य वाढ लक्षात घेता, ३ प्रवेश रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
शहरांचे सुशोभीकरण
अयोध्या, वाराणसी, चित्रकूट, लक्ष्मणपुरी (लखनौ ), विंध्याचल, प्रयागराज, नैमिषारण्य, गोरखपूर, मथुरा, बटेश्वर धाम, गढमुक्तेश्वर, शुक्रतीर्थ धाम, माता शाकंभरीदेवी, सारनाथ आणि इतर महत्त्वाच्या स्थळांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
परिक्रमा मार्गांविषयी घोषणा
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचलमध्ये माता विंध्यवासिनी मंदिर, माता अष्टभुजा मंदिर, माता कालिखोह मंदिर यांना जोडणारे प्रदक्षिणा मार्ग आणि सार्वजनिक सुविधा यांमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही चालू आहे. महाकुंभ २०२५ अंतर्गत विविध कामांसाठी १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.