पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (वय ९६ वर्षे) यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्याविषयीची माहिती देणारा लेख येथे देत आहोत.
१. लालकृष्ण अडवाणी यांची पार्श्वभूमी
सध्याच्या पाकिस्तानातील कराचीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांचा ८ नोव्हेंबर १९२७ या दिवशी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णचंद आणि आईचे नाव ज्ञानीदेवी होते. देशाच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. त्यापूर्वी अडवाणी यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मधून कायद्याची पदवी घेतली. २५ फेब्रुवारी १९६५ या दिवशी त्यांचा कमला अडवाणी यांच्याशी विवाह झाला. त्यांना २ मुले आहेत.
२. राजकीय जीवन आणि रथयात्रा
अडवाणी हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी वर्ष १९५१ मध्ये स्थापन केलेल्या जनसंघात सामील झाले. पुढे त्यांनी वर्ष १९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केला आणि वर्ष १९८० मध्ये भाजपची स्थापना केली. लालकृष्ण अडवाणी हे ३ वेळा भाजपचे अध्यक्ष, तर ४ वेळा राज्यसभा खासदार आणि ५ वेळा लोकसभा खासदार राहिले आहेत. वर्ष १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री झाले. त्यानंतर वर्ष १९९९ मध्ये भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री, तर वर्ष २००२ मध्ये दुसर्यांदा स्थापन झालेल्या वाजपेयी सरकारमध्ये ते उपपंतप्रधान बनले. वर्ष १९९० मध्ये भाजपने लालकृष्ण अडवाणींच्या पुढाकाराने अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी आंदोलन चालू केले. यासाठी अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. अडवाणी यांनी पुढे श्रीराममंदिर आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे भारतीय राजकारणाला हिंदुत्वाची नवीन दिशा मिळाली.
३. रथयात्रा अडवून अडवाणी यांना अटक
अडवाणी यांनी श्रीराममंदिरासाठी काढलेल्या रथयात्रेने उत्तर भारतातील राज्यांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढला. अडवाणी यांनी रथयात्रेमध्ये ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे’ अशी घोषणा दिली. ही रथयात्रा पुढे बिहारमध्ये पोचली, त्या वेळी लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अडवाणी यांची रथयात्रा रोखण्याची योजना आखली. २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रथयात्रा समस्तीपूरमध्ये असतांना अडवाणी यांचा मुक्काम ‘समस्तीपूर सर्किट हाऊस’मध्ये होता. २३ ऑक्टोबरच्या पहाटे ५.३० वाजता पोलिसांनी अडवाणी यांना अटक केली. त्या वेळी अडवाणी यांनी अटक करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांकडून कागदपत्रे पडताळून घेतली. त्या वेळी त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींना पत्र लिहून केंद्रातील विश्वनाथ प्रताप सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. पोलिसांनी अडवाणी यांना अटक केली आणि केंद्र सरकार पडले.
४. श्रीराममंदिराविषयी काय म्हणाले होते लालकृष्ण अडवाणी ?
श्रीराममंदिरासाठी काढलेल्या रथयात्रेविषयी अडवाणी यांनी त्यांच्या ‘माय कंट्री माय लाइफ’ (माझा देश माझे जीवन) या आत्मचरित्रात लििहले होते, ‘मी जे केले ते त्याग नव्हते. पक्ष आणि देश यांच्या हिताचे काय ? आणि काय योग्य आहे ? याचे तार्किक मूल्यमापन करण्याचा तो परिणाम होता.’ वर्ष २०१४ मध्ये पहिल्यांदाच नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. त्यानंतर मोदी यांचे कौतुक करतांना अडवाणी म्हणाले होते, ‘‘नियतीने ठरवले होते की, अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल. प्रभु श्रीरामानेच आपल्या भक्ताची निवड या पवित्र कार्यासाठी केली आहे.’’
(साभार : विविध संकेतस्थळे)