साहित्य संमेलनांना उतरती कळा !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे चालू असलेल्या ‘९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…

१. संमेलनांतील फोलपणा !

१ अ. राजकीय व्यक्तींचा समावेश ! : सध्या साहित्य संमेलन म्हटले की, त्याला राजकीय गंध असतोच. वरकरणी जरी साहित्य आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे वेगळी असली, तरी त्यातील राजकारणाचा समावेश असल्याचा विषय वारंवार चघळला जातो. संमेलनात राजकीय व्यक्तींचा भरणाही असतो. संमेलनाचे उद्घाटन एखाद्या मान्यवर साहित्यिकाकडून आतापर्यंत केले जात होते; पण आता राजकारण्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाते. साहित्य क्षेत्रातील उद्घाटनाचा मान त्यात योगदान नसणार्‍या राजकीय व्यक्तीला देणे इथपासूनच हे संमेलन खटकते.

सौ. नम्रता दिवेकर

१ आ. संमेलनातून मराठीला दिशा न मिळता तिची दशा होणे : आतापर्यंतची अनेक संमेलने पाहिली, तर लक्षात येते की, त्यांचा दर्जा ढासळतच चालला आहे; कारण सध्या दर्जेदार, खुमासदार शैली असणारे लिखाणच केले जात नसल्याने साहित्याचा स्तर आपोआपच न्यून होत आहे. प्रत्येक वर्षी संमेलनात अनेक ठराव पारित केले जातात; पण त्यांनुसार कृती होते का ? हे कोण पहातो ? त्या ठरावांचा पाठपुरावा कोण घेतो ? केवळ खाण्यापिण्याकडेच अधिक लक्ष दिले जाते. संमेलनाच्या माध्यमातून केवळ दिखाऊपणाच केला जातो. मराठी संवर्धनाच्या घोषणा दिल्या जातात; पण वर्षभर अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच उपक्रम राबवले जातात. संमेलन साहित्यिकांच्या वैचारिक पातळीवर न होता काही अंशी मनोरंजनात्मक स्तरावर पार पडते. संमेलनांच्या माध्यमातून अनेकदा पुरो(अधो)गामी, तसेच साम्यवादी विचारसरणी सर्वांवर लादण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच जातीयवादी विद्वेषही पसरवला जातो. यामुळे ही संमेलने खरोखर तितक्या गांभीर्याने पार न पडता उथळ स्वरूपाची वाटतात. एक संमेलन पार पडले म्हणजे सोपस्कार केल्यासारखेच वाटते. त्यातून ना दिशा मिळते, ना मराठी भाषेची अभिजात दर्जा मिळण्याकडे वाटचाल होते ! मराठीची दशाच होऊन जाते. हे थांबायला हवे. अन्य गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ‘मराठी साहित्याचा दर्जा वाढवणे हे आपले दायित्व आणि कर्तव्य आहे’, हे प्रत्येक साहित्यिकाने लक्षात घेऊन तसे प्रयत्न करावेत.

१ इ. संमेलनांतून अपेक्षित वैचारिक मंथन नाही ! : वर्ष १८७८ पासून या संमेलनांना आरंभ झाला; पण आजवरच्या संमेलनांना उचित यश प्राप्त झालेले नाही. मराठी भाषेला अद्याप अभिजात दर्जा न मिळणे, मराठी शाळांना पुरेसे अनुदान न मिळणे, शासकीय स्‍तरावर अपेक्षित असा मराठीचा वापर न वाढणे, पुरेशा दर्जेदार-सृजनशील नवसाहित्‍य निर्मितीला प्रोत्‍साहन न मिळणे, मराठी भाषा भवन अस्तित्वात नसणे हे सर्व मराठी भाषेच्या संवर्धनातील अडथळे आहेत. आतापर्यंत ९७ संमेलने झाली, तरी त्यातून अपेक्षित वैचारिक मंथन झालेले नाही, हे त्या संमेलनांचे काही अंशी अपयशच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील कुठल्या तरी एका जिल्ह्यात संमेलन भरवले जाते; पण त्याची नोंद तितक्या प्रमाणात घेतली जाते का ? हेही पहायला हवे. मराठी माणसाला साद तर घालायचीच आहे; पण त्याला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करणे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

१ ई. कालौघात संमेलनांची लाचारतेकडे वाटचाल ! : ‘मराठीला अभिजात दर्जा देण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही’, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत ३ ऑगस्ट २०२३ या दिवशी सांगितले होते. ही स्थिती आहे मराठीची…! यंदाचे साहित्य संमेलन पाहिले, तर ना कुठे त्याची चर्चा ना प्रसारमाध्यमांकडून त्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण वृत्तांकन ! अशामुळे ‘संमेलने लाचार होत आहेत’, असे वाटल्यास चूक काय ? ९७ व्या संमेलनाची ही स्थिती असेल, तर १०० व्या संमेलनाच्या स्थितीचा विचारच न केलेला बरा ! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांपेक्षा फेसबुक किंवा ‘एक्स’ यांवरील लिखाणाची वाचनीयता, आशयघनता अधिक प्रमाणात असते. त्यामुळे अशा संमेलनांना विचारतो कोण ? अशी दुःस्थिती होत आहे. कालौघात या संमेलनांना भावी पिढी किती महत्त्व देईल, यात शंकाच आहे.

 १ उ. प्रतिभासंपन्नांच्या मांदियाळीत शस्त्रप्रदर्शन (?) : यंदाच्या संमेलनात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आता हा खटाटोप कशासाठी ? साहित्य संमेलन आणि शस्त्र ही तर उघडउघड विसंगतीच आहे. साहित्यिकांचे शस्त्र लेखणी हेच असते. हे लेखणीरूपी शस्त्र त्यांनी वापरले, तर त्यातून मोठा उत्कर्ष साध्य होणार आहे; पण तसे न झाल्याने प्रतिभासंपन्नांच्या मांदियाळीत लावलेले शस्त्रप्रदर्शन खटकतेच !

२. पालटलेली वाचनसंस्कृती !

काही दशकांपूर्वी वाचन संस्कृतीविषयी सर्वांनाच निरतिशय प्रेम होते. ग्रंथ, कांदबर्‍या, मासिके, पाक्षिके, काव्यसंग्रह या आणि अशा अनेक माध्यमांमुळे मराठी माणूस खर्‍या अर्थाने वाचक झाला होता. कालांतराने यात पालट होत हातातील पुस्तकांची जागा भ्रमणभाष, भ्रमणसंगणक यांनी घेतली. अनेक जण मन मोकळे करण्यासाठी ‘ब्लॉग’चा (संकेतस्थळाच्या माध्यमातून स्वतःचे विचार पोचवणे) आधार घेऊ लागले. काही जण सामाजिक माध्यमांद्वारे व्यक्त होऊ लागले. अर्थात् प्रत्येकाची अभिव्यक्त होण्याची शैली भिन्न आणि काही जणांची तितकीच दर्जेदारही असे. साहित्यिकांच्या तोडीस तोड लिहिणारेही काही जण आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये वाचन संस्कृती आणखीनच मागे पडू लागली; कारण वाचनीय असे लिखाणच दुर्मिळ झाले आणि ती जागा आता ‘ब्लॉग’ ‘व्हिडिओ’, ‘रील्स’ यांनी घेतली. हाती लेखणी घेणारे काही हिंदुत्वनिष्ठ विचारवंतही आता स्वतःच स्वतःचे व्हिडिओ चित्रीत करून प्रसारित करू लागले. देश पालटत आहे, तसतशी अभिव्यक्त होण्याची माध्यमेही पालटत आहेत. आता केवळ पुस्तकांतूनच वाचनीय आणि बोधप्रद मिळते, असे नव्हे, तर ते भ्रमणभाषच्या माध्यमातूनही साध्य होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगासमवेत धावायचे असेल, तर आधुनिकतेची कास धरावीच लागणार आहे. आता पुस्तके वाचायला वेळ कुणाला आहे ? पण व्हिडिओ पहाण्यासाठी वेळ काढणारे अनेक जण आहेत. साहित्यिकांनीही हा पालट हेरून त्यांचे साहित्य अधिकाधिक प्रमाणात नव्या पिढीला, म्हणजेच नव्याने उदयास येऊ पहाणार्‍या तांत्रिक जगतातील साहित्यिकांना उपलब्ध करून द्यावे आणि स्वतःचा हेतू साध्य करावा. परिस्थितीनुसार पालटणे हेच कालसुसंगत ठरेल ! तसे झाल्यासच मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासाला पुरेसा वाव मिळेल. मराठीलाही योग्य दिशा मिळून तिची जोपासना होईल. हीच तर मराठीची सेवा करण्याची उत्कृष्ट संधी आहे; पण यासाठी एकांड्या शिलेदारासारखे प्रयत्न न करता सर्वांनीच हातभार लावणे सयुक्तिक ठरेल. अलीकडच्या काळात निर्माण केला गेलेला मराठी शब्दकोश संगणकावर सहजतेने उपलब्ध होणे, हे या पार्श्वभूमीवर मराठीजनांसाठी दिलासाजनक आहे.

३. आजची पिढी आणि साहित्य !

आताच्या तरुण पिढीला नव्या साहित्यिकांची नावे विचारली, तर कुणालाही त्याचे उत्तर देता येणार नाही; कारण त्यांच्याविषयी तितकेसे ठाऊकच नाही.

काही दशकांपूर्वीचे पु.ल. देशपांडे, प्र.के. अत्रे, वि.स. खांडेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी ही नावे कुणाच्याही तोंडी सहजच आणि अग्रक्रमाने येतात. आणखी काही वर्षे मागे गेलो, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे लिखाण पाहिले, तर त्यांनाही मोठे साहित्यिक संबोधले जाते. तेव्हा त्यांच्या काळी कुठे संमेलने आयोजित केली जात होती ! असे असले, तरी त्यांच्या लिखाणाचा दर्जाच विशेष होता. आताची परिस्थितीच वेगळी आहे, हे लक्षात घेऊन परिवर्तन करायला हवे.

४. मराठीची तुटलेली नाळ !

‘माझा मराठीची बोलु कौतुकें । परि अमृतातेंहि पैजासीं जिंके । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।। – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी ६.१४)’, अशा ओव्यांतून मराठीची महती सांगणारे, म्हणजेच ब्रह्मविद्या शब्दरूपातून व्यक्त करणारे एकमेवाद्वितीय संत ज्ञानेश्वरच होते. अमृतालाही पैजेने जिंकणारी अक्षरे असणारी भाषा कोणती ? तर मराठी ! संत ज्ञानदेवांची ही ओळ वाचूनच माय मराठीविषयी किती अभिमान वाटतो ! अभिमानाने छाती फुलून येते !

‘तुमचे आवडते पुस्तक कोणते ?’, हा प्रश्न जर आजच्या मराठी युवकाला विचारला, तर तो चुकूनही मराठी भाषिक पुस्तकाचे नाव सांगत नाही. तो एखादी इंग्रजी कादंबरी किंवा इंग्रजी भाषिक लेखकाचे पुस्तक यांची नावे सांगतो. मराठी भाषेची नाळ मराठीशी टिकवून ठेवण्यात सर्वच जण न्यून पडत आहेत.

मराठी भाषा रक्तबंबाळ झाली आहे, ती खाचखळग्यांतून वाट काढत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी कानी पडणारी शुद्ध मराठी भाषा आता १० शब्द असणार्‍या एका वाक्यात केवळ २-३ शब्दांचीच राहिलेली असणे, हे तिचे अस्तित्व संपत असल्याचेच लक्षण नव्हे का ? एक मराठी आई तिच्या ३-४ वर्षांच्या मुलाला ‘तुझी टंग (जीभ) कुठे आहे दाखव ?’, असे विचारते. मग तो मुलगा त्याची ‘टंग’ दाखवतो. असे होत असेल, तर अमृतवाणी असणारी मराठी भाषा या जिव्हेवर कधीतरी टिकेल का ? संमेलने आयोजित करणार्‍यांनी आणि संमेलनांच्या आजवरच्या माजी अध्यक्षांनीही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. पायाच डळमळीत असेल, तर साहित्य जगताचा डोलारा कसा नीट राहील ? लक्षात घ्या, मराठी बोलणाराच भाषेचे संवर्धन करू शकतो.

५. साहित्यिकांचे दायित्व !

मराठी भाषेचा केवळ साहित्य क्षेत्रापुरता विचार न करता साहित्यिकांनी व्यापक होऊन योगदान द्यायला हवे.

अ. मराठी भाषेतील काही वृत्तपत्रांमध्ये शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळतात. त्या पाहूनच वर्तमानपत्र वाचावेसे वाटत नाही. अशा वृत्तपत्रांना त्यांच्या भाषिक दायित्वाची जाणीव कोण करून देणार ?

आ. ‘मोबाईल’ला भ्रमणभाष, तर ‘कॉम्प्युटर’ला संगणक म्हणणे, ही भाषेतील तर्कशुद्धता आणि मराठीविषयीचा अभिमान मराठीतील मान्यवरांनीच समाजात निर्माण करायला हवा. इंग्रजी भाषेला समृद्ध करण्यास सर्वच जण पुढे येतात; पण ती कृती मराठीच्या संदर्भात होत नाही. यासाठी कुणी प्रयत्न करायचे ? जे मराठी भाषातज्ञ आहेत, त्यांनीच यासाठी प्रयत्न करायला हवेत.

इ. मराठी साहित्य परिषदेने परकीय शब्द न्यून करून स्वकीय शब्दांच्या अधिकाधिक वापरासाठी एखादा उपक्रम राबवला आहे का ? तसे झाले नसेल, तर त्यादृष्टीनेही प्रयत्न व्हायला हवेत.

ई. आज ‘बॉलीवूड’ (हिंदी चित्रपटसृष्टी) नावाच्या जंगलामुळे मराठी चित्रपट मागे पडत आहेत. मराठीची अवीट गोडी आणि अभिमानच उरला नसल्याने मराठी चित्रपट पहायला जाणे, म्हणजे मागासलेपण वाटते. त्यामुळे सगळी मराठी भाषिक गर्दी ही हिंदी चित्रपट प्रदर्शित करणार्‍या चित्रपटगृहासमोर दिसते. केवळ ‘अरेरे’ म्हणून सर्वजण सोडून देतात. मराठीला सुगीचे दिवस यायला हवेत.

सर्वांना मराठीचे अप्रूप वाटेल असे काहीतरी करायला हवे. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, या अनुषंगाने मराठीला समृद्ध करण्यासाठी आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

६. अपेक्षित राष्ट्रकार्य !

साहित्यिकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य असते; पण लिखाणातील त्या शैलीचा ते केवळ स्वप्रसिद्धीसाठी वापर करून घेतात. आपल्याला जी शब्दप्रतिभा लाभलेली आहे, तिचे राष्ट्रकार्यात काहीतरी योगदान द्यायला हवे, असा पुसटसा विचारही त्यांच्या मनात येत नाही. राष्ट्रासमोरील ज्वलंत समस्या असणार्‍या भ्रष्टाचार, बलात्कार, आतंकवाद, धर्मांधांचे विविध प्रकारचे जिहाद, नक्षलवाद, साम्यवाद यांच्या विरोधात लिहिण्यास त्यांची लेखणी धजावतच नाही. या समस्यांच्या जोडीला अनेक ज्वलंत प्रश्नांना सामान्य लोक प्रतिदिन सामोरे जात असतात. याविषयीही ते कोणतीच भूमिका घेत नाहीत. ‘राष्ट्र टिकले, तरच आपले साहित्यही टिकणार आहे’, हे लक्षात घेऊन प्रज्ञावंतांनी राष्ट्रकार्यात योगदान द्यावे, हीच अपेक्षा !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.२.२०२४)

खरे साहित्यिक कोण ?

दर्जेअभावी साहित्यिक, संमेलने, पुस्तके या सगळ्यांच्या बाजारात मराठीप्रेमी किंवा मराठी वाचक कुठेतरी भरकटला जातो. त्याला दिशा मिळत नाही. ‘समाजहित साधणे’, हे साहित्यिकाचेही दायित्व असते; पण ते तितके साध्य होत नाही. याला कारणीभूत साहित्य आहे. आज ‘खरे’ साहित्यच उपलब्ध नाही. ते उपलब्ध करून देण्यासाठी साहित्यिकही खराच हवा. खरे साहित्य आणि खरा साहित्यिक म्हणजे नेमके काय ? तर आत्मज्ञान प्रदान करून वृत्तीत पालट घडवेल, ते खरे साहित्य आणि ते देऊ शकतो, तो खरा साहित्यिक ! हे खरे साहित्यिक म्हणजे संत ! संतांच्या लिखाणातून खर्‍या अर्थाने मनुष्य आणि समाज घडतो. मनुष्याच्या जीवनाला दिशा मिळते आणि तो मनुष्यजन्माचे सार्थक करून घेण्यास पात्र ठरतो. आजपर्यंत एकातरी साहित्यिकाने हे साध्य करून दाखवले आहे का ? नाही ना ! आजच्या साहित्यिकांच्या लेखणीमध्ये ना धार उरली आहे, ना वास्तवाचे ज्ञान ! एखाद्याला जीवनाच्या संघर्षात वाटचाल करतांना प्रेरणादायी ठरणारे साहित्य आजवर निर्माण झालेले नाही. साहित्यिक मनोरंजनात्मक, तसेच मानसिक आणि व्यावहारिक विचारधारा देऊ शकतात; पण हे विचार तात्कालिक असतात, तर संतसाहित्य हे चिरकाल टिकणारे अन् मार्गदर्शक असते.

थोडक्यात काय, तर समाजाला घडवणे आणि परिवर्तन करणे हे कार्य केवळ संतच करू शकतात. आजपर्यंतच्या संतांनी त्यांच्या लिखाणातून मराठी भाषा संवर्धन करणे, संस्कृती जोपासणे हे कार्य केले. ७०० वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास पाहिला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, त्याही पूर्वी वाल्मीकिऋषि, अगस्त्यऋषि, तसेच रामकृष्णादि झालेले अवतार यांनी आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडवून आणला. मनुष्यामध्ये खर्‍या अर्थाने पालट घडवून आणला. इतकी उदात्त विचारप्रकिया संतांचे साहित्य किंवा वाङ्मय यांतूनच लाभते. ‘ज्ञानेश्वरी’, तुकोबांचे अभंग, समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक आजही अनेक घराघरांमध्ये म्हटले जातात. असे कुणातरी साहित्यिकाच्या संदर्भात होते का ? या सर्वांच्या तोडीचा असा कुणी साहित्यिकच अजून सिद्ध झाला नाही. सरतेशेवटी ‘आत्मज्ञानाचे कार्य करणारे संत हेच खरे साहित्यिक आहेत’, असे म्हणावेसे वाटते. या खर्‍या साहित्यिकांचा आदर्श घेऊन साहित्य क्षेत्राने भरारी घ्यावी, हीच अपेक्षा !

– सौ. नम्रता दिवेकर, पनवेल (१.२.२०२४)