परीक्षेत चांगले गुण मिळवणेच सर्वकाही नव्हे ! (Delhi HC To IIT Students)

  • देहली उच्च न्यायालयाचा ‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांना सल्ला !

  • ‘आयआयटी दिल्ली’तील २ विद्यार्थ्यांनी अभ्यासात चांगली कामगिरी करण्याच्या ताणातून केली होती आत्महत्या !

नवी देहली – परीक्षेत चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे असले, तरी ही जीवनातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट नव्हे, हे आयआयटीच्या विद्यार्थ्यांना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. सर्वोत्तम कामगिरीच्या दबावाला बळी न पडता सर्वोत्तम कामगिरी करता येऊ शकते, असे निरीक्षण देहली उच्च न्यायालयाने नोंदवले. ‘आयआयटी दिल्ली’ या भारतातील प्रथितयश अभियांत्रिकी विश्‍वविद्यालयातील २ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली. यावर न्यायालयाने वरील वक्तव्य केले. न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांनी या खटल्याची सुनावणी केली.

या वेळी न्यायमूर्ती म्हणाले की, तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर भर दिला गेला पाहिजे. यामुळे विद्यार्थी जीवनात त्यांना सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास आत्मविश्‍वास मिळू शकेल.

गेल्या वर्षी ‘आयआयटी दिल्ली’च्या अनुसूचित जातीतील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. यावर त्यांच्या पालकांनी संस्थेवर जातीभेदाचा आरोप केला होता आणि संस्थेच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती, तसेच देहली उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, ‘आयआयटी दिल्ली’मध्ये जातीभेदाचे पुरावे सापडले नाहीत. दुसरीकडे असे आढळून आले की, विद्यार्थी अनेक विषयांत अनुत्तीर्ण होत होते. त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. यावर उच्च न्यायालयाने सांगितले की, जातीभेदाच्या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत.

संपादकीय भूमिका

‘आयआयटी’तील विद्यार्थ्यांना ‘क्रीम ऑफ द कंट्री’, म्हणजे ‘देशातील सर्वांत प्रतिभावान विद्यार्थी’ असे संबोधिले जाते. साहजिकच आपापल्या क्षेत्रांतील सर्वांत प्रगल्भ बुद्धी असलेले विद्यार्थी येथे एकत्र येत असतात. त्यामुळे अशा वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या त्यांच्या स्वत:कडून साहजिक अपेक्षा असतात. स्पर्धेपेक्षा स्वत:कडून सर्वोत्तम, परंतु निरपेक्ष कामगिरी करणे अत्यंत आवश्यक असते. येथेच  अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित होते. विद्यार्थ्यांकडून बालवयापासून साधना करवून घेणे का आवश्यक आहे, हे आत्महत्येसारख्या टोकाच्या प्रयत्नांतून लक्षात येते !