विविध बँकांमध्ये सहस्रो कोटी रुपयांची ठेव असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका घेत आहे ५५० कोटी रुपयांचे कर्ज !

रुग्णालय उभारणी आणि महामार्ग सुशोभीकरण यांसाठी कर्ज !

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध अधिकोषांमध्ये (बँकेमध्ये) ५ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यावर ८ टक्के दराने व्याज मिळते. असे असतांनाही मोशी रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी ५५० कोटी रुपये कर्जाचे प्रस्ताव अधिकोषांतून मागवण्यात आले आहेत. या कर्जामुळे नागरिकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा पडणार आहे.

महापालिकेकडून शहरांमध्ये हरित रुग्णालयांची उभारणी आणि महामार्गांचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे. महामार्गावर पादचारी मार्ग, सायकल मार्ग उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध बँकांमधून अल्प व्याजदराने १२ ते १५ वर्षे समयमर्यादेचे कर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अल्प दर मिळाल्यास बँक आणि कर्ज घेण्याची निश्चिती करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक सदस्यांची मुदत १२ मार्च २०२२ या दिवशी पूर्ण झाल्याने प्रशासकीय राजवट चालू आहे. ही राजवट चालू असल्याने सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे निर्णय प्रशासनच घेत आहे. आयुक्तांनी विषय मांडल्यानंतर प्रशासक म्हणून तेच विषय संमत करतात. त्यामुळे कर्जाचा विषय असाच घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.