निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे मत
नवी देहली – जातीवर आधारित राजकारणाला सामान्य लोक फार प्रतिसाद देत नाहीत. राजकारणात एखादे सूत्र एकदाच चालते. ते सूत्र वारंवार उगाळता येत नाही. जातीवर आधारित राजकारणाचे सूत्र मंडल आयोगाच्या वेळी गाजले; पण आता त्याला विशेष महत्त्व मिळणार नाही, असे मत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मांडले. बिहारमधील जातीवर आधारित सर्वेक्षणाला आधार मानून काँग्रेसकडून देशव्यापी जातीनिहाय सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहेे. त्यावर प्रशांत किशोर यांनी वरील मत व्यक्त केले.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की,
१. उत्तरप्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांत जातीवर आधारित राजकारणाची अधिक चर्चा होते; पण तेथील लोकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करतात. या राज्यांतही पंतप्रधानांची जात पाहून कुणीही मतदान करत नाही. त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व पाहून मतदान केले जात आहे.
२. मतदार भाजपला नाही, तर पंतप्रधान मोदी यांना मतदान करतात. केवळ मोदी यांची जात पाहून किती लोक मतदान करत असतील ?
३. मोदी हे स्वयंभू नेते आहेत, असे अनेकांचे मत आहे. दुसरीकडे राहुल गांधी हे घराणेशाहीचे प्रतीक असल्याची मतदारांची भावना आहे. मोदी प्रामाणिक, तर काँग्रेस भ्रष्ट असल्याचा समज आहे.