नवी मुंबई – जगात मराठी भाषा शिकण्यासाठी काही प्रमाण किंवा प्रमाणपत्र पाहिजे असेल, तर संबंधित संस्थांना मराठी भाषा विद्यापिठाशी जोडून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले. ते विश्व मराठी संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,…
१. छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, तो कोणत्या जाती-धर्मापर्यंत मर्यादित नव्हता, तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो वैश्विक धर्म सांगितला, त्याचाच हा आपला महाराष्ट्र धर्म आहे.
२. वैश्विक गुणांमुळे जगाच्या पाठीवर मराठी माणूस रहातो. त्यांनी तेथेही मराठी संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.
३. ‘पसायदाना’ला ७५० वर्षे झाली, मराठीतील आद्यग्रंथ ‘लिळाचरित्र’ याला ९०० वर्षे झाली. त्यामुळे मराठी भाषा ही सनातन आणि शाश्वत आहे. जगातील सर्वांत समृद्ध भाषा मराठी आहे. तिच्याकडे आपण दुर्लक्ष केले, तर केवळ एक भाषा अल्प होईलच; पण आमच्या पूर्वजांनी जो सहस्रो वर्षांचा ठेवा आम्हाला दिला आहे, तो ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचू शकणार नाही.
४. व्यावहारिक भाषा म्हणून इंग्रजी भाषेकडे पाहिले जात असल्याने मुलांना इंग्रजी शाळेत शिकवावे लागले, तरी घरी मराठीतच बोला. त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये मराठीची गोडी निर्माण करू शकतो.
५. जर्मन, चीन, जपान या भाषा ज्ञानभाषेत परिवर्तित झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत मराठी भाषेलाही ज्ञानभाषेत परिवर्तित करणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात ‘मातृभाषेतून सर्व शिक्षण देता आले पाहिजे’, असा विचार मांडला.