चाडेगाव, नाशिक येथील संत पू. यशोदा नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

‘नाशिक जिल्ह्यातील चाडेगाव येथील संत पू. यशोदा गंगाधर नागरेआजी (वय ९५ वर्षे) यांनी २.१०.२०२३ या दिवशी त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला. २९.१.२०२४ या दिवशी त्यांचे चौथे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांची धाकटी मुलगी अन् सनातनच्या साधिका सौ. सुनीता गीते यांना पू. आजींविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. यशोदा नागरेआजी

१. अन्नत्याग करणे

‘पू. यशोदा गंगाधर नागरेआजींनी देहत्यागाच्या दीड मास आधी अन्नत्याग केला होता. त्या थोडासा चहा किंवा दूध प्यायच्या. शेवटचे १५ दिवस त्या २ – २ घंट्यांनी केवळ १ – १ घोट पाणी प्यायल्या. शेवटचे ८ दिवस पू. आजींनी डोळे उघडले नाहीत आणि त्या बोलतही नव्हत्या. त्या मुद्रा करून अखंड नामजप करत होत्या. देहत्यागाच्या ४ दिवस आधी त्यांच्या चेहर्‍यावर दैवी कण दिसले.

२. सनातनचे साधक भेटायला गेल्यावर पू. आजींना आनंद होणे

सौ. सुनीता गीते (पू. नागरे आजी यांची धाकटी मुलगी)

पू. आजींना दीड मासांपासून नातेवाईक भेटायला यायचे; पण त्या नातेवाइकांकडे अधिक वेळ बघत नसत. एक दिवस सौ. विजया प्रकाश काळे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी पू. आजींना थोडा खाऊ भरवला, तेव्हा आजींनी उपस्थित सर्व साधकांकडे डोळे उघडून बघितले आणि नमस्कार केला. देहत्यागाच्या ३ दिवस आधी नाशिकचे साधक श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), त्यांच्या पत्नी सौ. ज्योती नागरे आणि त्यांच्या आई सौ. मंगला सहदेव नागरे भेटायला आल्या होत्या. तेव्हा पू. आजींनी सर्वांकडे पाहून हात जोडले आणि नमस्कार केला. पू. आजींना सनातनचे साधक भेटल्यावर आनंद होत असे.

३. ऐकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती

आजींनी अन्न घेणे बंद केल्याने त्यांना पुष्कळ थकवा आला होता. तरीही त्यांना दोघांनी धरून नेल्यावर अंघोळीसाठी त्या पायी चालत जात असत. देहत्यागाच्या दिवशी आम्ही त्यांना चमच्याने तीर्थ (फलटण, जि. सातारा येथील महानुभव पंथाचा आश्रम आहे, त्या आश्रमातील तीर्थ) आणि दूध पाजले. ते त्यांनी घेतले. पू. आजींमध्ये ऐकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती होती.

४. देहत्यागापूर्वी आजींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दोन वेळा कपाळाला लावून परात्पर गुरुदेवांचे दर्शन घेतले.

५. पू. आजींच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे

अ. पू. आजींचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता.

आ. वातावरण प्रसन्न आणि शांत होते.

इ. पू. आजींच्या खोलीत गेल्यावर काही साधकांचा नामजप चालू झाला. तेथे चैतन्य जाणवले.

ई. पू. आजींनी स्वप्नात दर्शन देणे : लक्ष्मीपूजेच्या आदल्या रात्री पू. आजी त्यांच्या नातवाच्या (श्री. सुनील बबन नागरे, पू. आजींच्या मुलाचा मुलगा, वय ५० वर्षे) स्वप्नात आल्या. तेव्हा पू. आजींनी पुष्कळ दागिने घातले होते. त्यांनी कुंकू लावले होते आणि सुंदर साडी नेसली होती. स्वप्नात स्वर्गलोकासारखे दृश्य दिसले. तिथे पू. आजी फिरत होत्या आणि त्या पुष्कळ आनंदी दिसत होत्या. आजूबाजूला ऋषिमुनी ध्यान-धारणा करत होते. तसेच तिथे झाडे, वेली आिण नदी होती. साधारण २५ वर्षांपूर्वी पू. आजी जशा दिसायच्या, तशा त्याला स्वप्नात दिसल्या.

उ. देहत्यागानंतरच्या विधीच्या वेळी फुलपाखरू येणे : पू. आजींच्या मासिक श्राद्धाच्या दिवशी देवघरात एक फुलपाखरू आले होते. तेच फुलपाखरू दशक्रियेच्या आदल्या दिवशी गीतापठणाच्या वेळी आले होते. तसेच नवव्या दिवशी गीतापारायणाच्या दिवशी पू. आजींच्या खोलीमध्ये २ फुलपाखरे बसली होती.’

– सौ. सुनीता गीते (पू. नागरे आजी यांची धाकटी मुलगी), गंगापूर रोड, नाशिक. (६.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक