हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती !
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ स्वराज्य नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, अन् दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. आता रामराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हुतात्मा स्मारक हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे ३० जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती समस्त हिंदु समाजाच्या वतीने कागल येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी यांनी २७ जानेवारीला ‘चांदी कारखानदार असोसिएशन’च्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकर ससे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हुपरी तालुका सेवाप्रमुख श्री. अमर कुलकर्णी, बजरंग दल शहरमंत्री श्री. अभिजित माने, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवाजी जाधव, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. संदीप सिदनुर्ले, भाजपचे हुपरी शहरप्रमुख श्री. सुभाष कागले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहरप्रमुख श्री. हृषिकेश साळी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख श्री. राजेंद्र पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे हे उपस्थित होते.
श्री. नितीन काकडे म्हणाले, ‘‘या सभेत हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे आणि सलग तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून येणारे भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचे मार्गदर्शन होणार आहे. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचेही अमूल्य मार्गदर्शन होणार आहे. सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसार चालू असून गेले काही दिवस विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा, होर्डिंग्ज, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे.’’