‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त मिळालेली सेवा करतांना साधिकेला गुरुदेवांच्या कृपेने आनंद मिळणे आणि तिने रामनाथी (गोवा) येथील चैतन्याची घेतलेली प्रचीती !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्त आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवा मिळाल्याबद्दल आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाल्याबद्दल मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्त सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

सौ. कोमल हिरेमठ

१ अ. सेवा करतांना भाषेची अडचण न येणे : सेवा करतांना आरंभी माझ्या मनात ‘भाषेच्या अडचणीमुळे साधकांचे बोलणे न समजल्यास सेवा कशी करायची ?’, असा विचार येत होता. साधक हिंदी भाषेत बोलत असतांना मला त्यांचे बोलणे ८५ टक्के समजत होते. त्यानंतर माझ्या मनात ‘गुरुदेवांनी दिलेली ही सेवा कशी करायची ?’, असा विचार आला नाही. ‘माझ्या समवेत असलेल्या साधिका सौ. समृद्धी राऊत आणि कु. किरण व्हटकर यांनी सांगितल्यानुसार मला उत्तम रितीने सेवा करता येऊ दे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना होत होती. साधिकांनी सांगितल्यानुसार आमच्याकडून सेवा होत होती.

१ आ. सहसाधिकांनी सेवा शांतपणे आणि प्रेमाने समजावून सांगणे अन् भावाच्या स्तरावर सेवा केल्याने आनंद मिळणे : सेवा करतांना माझ्या मनात ‘समृद्धीताई आणि किरणताई यांना विचारले की, झाले’, असा विचार येत असे. त्यांना साधना आणि सेवा या संदर्भात काही विचारले, तर त्या दोघी जणी आम्हाला शांतपणे अन् प्रेमाने समजावून सांगत असत. त्यांनी आम्हाला स्वयंपाकघरात काही सेवा आणि महोत्सवाला आलेल्या अतिथींना पिण्याचे पाणी देण्याची सेवा दिली. हिंदुत्वनिष्ठांना पिण्यासाठी पाणी देतांना मला पुष्कळ आनंद होत होता. मला त्या सर्वांमध्ये गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी ‘मी माझ्या गुरूंना पिण्यासाठी पाणी देत आहे’, असा भाव ठेवल्याने मला आनंद मिळाला.

२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्याची आलेली प्रचीती !

अ. ‘माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे (काळे) आवरण रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.

आ. माझ्या मनात ‘आश्रम म्हणजे गुरुदेव ! आश्रमातील प्रत्येक वस्तू गुरुदेवांची आहे. त्या वस्तूंचा योग्य रितीने उपयोग करायला हवा’, असे विचार येत होते.

इ. मला वाटले, ‘आश्रमात प्रत्येक साधकाची काळजी किती चांगल्या प्रकारे घेतात ! साधकांना आवश्यक त्या सुविधा योग्य प्रमाणात दिल्या आहेत. साधकांना गुरुदेवांचा किती आधार वाटतो !’

ई. ‘मी माझ्या घरी आले आहे’, असे मला वाटले.

उ. ‘प्रतिदिन माझ्यात पालट होत आहे’, असे मला जाणवले.

गुरुदेवा, या अज्ञानी जिवाकडून सेवा करून घेतल्याबद्दल मी आपल्या चरणी अनन्य शरणागत भावाने कृतज्ञता अर्पण करते.’

– सौ. कोमल हिरेमठ, शिवमोग्गा, कर्नाटक. (२.७.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.