प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी – राज्यातील प्रथम क्रमांकाचे ९२ कोटी रुपये खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्यशासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’, हे घोषवाक्य (स्लोगन) घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासन जोरदार काम करत आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार आणि अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले,
१. जलजीवन मिशनमधून होणार्या नळपाणी योजनांसाठी ११०० कोटी रुपयांची संमती मिळाली आहे.
२. सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालवलेली हाऊसबोट येणार्या पर्यटकांना पहायला मिळेल. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे.
३. ए.पी.जे. अब्दुल कलाम जिल्ह्यातून घडले पाहिजेत. त्यासाठी गरिबांच्या मुलांना नासा आणि इस्रोला पाठवणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी ठरला आहे.
४. जिल्ह्याचा ३०० कोटी रुपयांचा आराखडा असून, शासन निश्चित यावर्षी निधी वाढवून देईल, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडेल.
५. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना या सर्व योजनांसाठी नियमानुसार खर्च करण्याचे नियोजन आम्ही करत आहोत.
६. पोलिसांच्या घरांचा प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.
७. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा आहे, त्या दृष्टीने प्राणी संग्रहालयाच्या कामास प्रारंभ झाला आहे. देशातला पहिला थ्रीडी मल्टिमिडिया शो येथे होत आहे.
८. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वांत उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ४ फेब्रुवारीला आहे.
९. सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.
१०. काजू बोर्डाचे ५ वर्षासाठी १३०० कोटी रुपये संमत केले आहेत. ‘आंबा बोर्ड’ असावे अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्त्वता मान्यता दिली आहे. त्याचसमवेत साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात ते जमा होतील.
ध्वजरोहणानंतर पालकमंत्री सामंत यांनी कवायत (परेड) निरीक्षण केले. त्यानंतर झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय पथक, गृहरक्षक दल, पोलीस बँड पथक, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एन्.सी.सी. आर्मी, एन्.सी.सी. नेव्हल,
पटवर्धन हायस्कूलचे एन्.सी.सी. आर्मी आणि अन्य पथके सहभागी झाली होती.