Live Without Mobile : महिनाभर भ्रमणभाषविना रहाता आल्यास मिळणार तब्बल ८ लाख रुपये !

आईसलँड येथील एका आस्थापनाने आयोजित केली स्पर्धा !

प्रतिकात्मक छायाचित्र

रेकेविक (आईसलँड) – सध्या भ्रमणभाष हा सामान्य जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. याचे लाभ अनेक आहेत; परंतु तोटे किंबहुना अधिक आहेत. तरीही याची वाईट सवय समाजात अनेकांना लागल्याचे रस्त्यावर, बसमध्ये, रेल्वेत अथवा विमानतळावर, म्हणजे कुठेही सहज निदर्शनास येते. यापासून स्वत:ला काही काळतरी अलिप्त ठेवण्याचे प्रयत्नही वाढीस लागले आहेत. याला ‘डिजिटल डिटॉक्स’ अशी संज्ञा आहे. याचा अर्थ सर्व डिजिटल उपकरणांशी ज्यात प्रामुख्याने भ्रमणभाषचा समावेश आहे, त्यापासून अमुक काळापर्यंत दूर रहाणे. याचाच एक भाग म्हणून आईसलँड येथील ‘सिग्गी’ नावाच्या आस्थापनाने अशी एक स्पर्धाच आयोजित केली आहे.

या स्पर्धेला आस्थापनाने ‘डिजिटल डिटॉक्स चॅलेंज’ असे नाव दिले असून यांतर्गत सहभागी स्पर्धकांनी एक महिनाभर त्यांच्या भ्रमणभाषपासून दूर रहायचे आहे. हे करू शकणार्‍या १० भाग्यशाली विजेत्यांना प्रत्येकी १० सहस्र डॉलर म्हणजे तब्बल ८ लाख ३१ सहस्र रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आरंभी स्पर्धकांना त्यांचे भ्रमणभाष आयोजकांच्या हाती सोपवावे लागणार आहेत. अगदी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यासच स्पर्धकांना भ्रमणभाषचा वापर करता येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • आज जागतिक मानवसमूह भ्रमणभाषच्या एवढा आहारी गेला आहे की, त्याला अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे लागत आहे. अध्यात्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !