श्रीकृष्णाने आपत्कालात राजाने कसे वागायचे हे शिकवणे

श्रीकृष्ण

१. धर्मसंस्थापन करणे

‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे. वाढवला म्हणजे धर्मसंस्थापना केली.

२. श्रीकृष्णाने कुणाचाच त्याग न करणे

कृष्णावतार हा द्वापारयुगातील आहे. या ठिकाणी युगमहिमाही लक्षात घेतला पाहिजे. रामावतारात एका सामान्य नागरिकाच्या, रजकाच्या शंकेवरून श्रीरामाने सीतेचा त्याग केला. राम त्याला शिक्षा करू शकला असता; पण त्याने तसे केले नाही. श्रीरामाप्रमाणे श्रीकृष्णाने कुणाचाच त्याग केला नाही. त्याच्या परमभक्त गोपिकांविषयी त्याला दुष्टांनी कमी कलंक लावला आहे का; परंतु त्याने एकातरी गोपीचा त्याग केला का ?

३. भक्ताला कमीपणा येऊ नये; म्हणून ईश्वराने स्वतःला कमीपणा घेणे

सीता आणि राम यांचे अलौकिकदृष्ट्या भक्त अन् ईश्वर असे संबंध असले, तरी लौकिकदृष्ट्या पती-पत्नी संबंध होते. गोपी आणि कृष्ण यांचे अंतरंग शिष्य अन् सद्गुरु असे संबंध होते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भक्ताला कमीपणा येऊ नये; म्हणून ईश्वर आपल्याला किती कमीपणा घेत असतो, हे यावरून लक्षात येते. भीष्माची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याने आपली प्रतिज्ञा मोडली; कारण भीष्म त्याचे महान भक्त होते. श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले. धर्मराजाच्या यज्ञात उष्टी काढली. संत जनाबाईंच्या गोवर्‍या घातल्या. कबिराचे शेले विणले. यांवरून गुरुपदाची यथार्थ कल्पना येते.’

– प.पू. काणे महाराज