एका इंग्रजाने अनुभवलेले भारताचे अद्वितीयत्व !

भारत ही ‘पुण्यभूमी’ अन् ‘कर्मभूमी’ आहे, हे दर्शवणारे उदाहरण !

सर जॉन वुड्रॉफ

१. भारताने धर्म आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांप्रमाणेच जीवनाच्या प्रत्येक दालनात अद्भुतता दाखवलेली असणे

‘मी जर भारतीय असतो, तर मी माझा आत्मा कुणालाच विकला नसता. एखादी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी जर स्वतःचा आत्मा द्यावा लागत असेल, तर त्या गोष्टीची थोरवी ती काय ? काही लोक बोलतात, त्याप्रमाणे भारतवर्षाने केवळ साधू-संत, योगी, महात्मे, तत्त्ववेत्ते आणि तत्सम लोकच निर्माण केले आहेत, असे म्हणणे निव्वळ विक्षिप्तपणाचे आहे. भारताने आपल्या जीवनात (मी भूतकाळाविषयी बोलतो) सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये क्रियाशीलता प्रकट केली आहे. भारताने धर्म आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आपली चिंतनशीलता व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे, तर त्याने जीवनाच्या प्रत्येक दालनात अद्भुतता दाखवली आहे.

अ. मोठमोठे राजे महाराज आणि सम्राट यांच्या राजसभा भारतीय इतिहासात गाजलेले आहेत. कुशल राजधर्माचे तेज त्याने प्रत्ययास आणून दिले आहे.

आ. प्रात्यक्षिक स्वयंशासन आणि सामूहिक जीवन यांचा अनुभव ग्रामसंस्थांद्वारे निदर्शनास आणून दिला आहे.

इ. युद्ध, खेळ, शास्त्रीय संशोधन, जागतिक व्यापार, सुपीक शेती आणि भव्य अन् विपुल स्मारकांच्या रूपातील कला (त्यांच्या व्यतिरिक्त इतरत्र कोठे आपणांस गाढ अन् चकाकणारे रंग आढळतील ?) यांतही भारताने आपले सामर्थ्य प्रकट केले आहे.

ई. याचप्रमाणे वाङ्मयीन आणि प्रात्यक्षिकरित्या काव्य, भावभावना, उत्कटता यांचाही विलास त्याने केला आहे.

२. भारताच्या अंतरंगात शिरलेल्यांनाच या देशाच्या आगळ्या प्रभेचा अनुभव येणे शक्य !

जे लोक भारतीय जनतेला इतर देशांतील जनतेपेक्षा अल्पमात्र भिन्न समजतात अन् तसे बोलतात, ते केवळ वरवर पहातात. ‘तिच्या अंतरंगात ते शिरलेच नाहीत’, असे म्हणावे लागते. ज्यांनी या देशाच्या अंतरंगात खोल प्रवेश केला आहे, त्यांना असा अनुभव आल्याविना रहाणार नाही की, या देशाची प्रभा काही आगळीच आहे !

– सर जॉन वुड्रॉफ, ‘शक्ती आणि शाक्त’ (इंग्रजीवरून) पृ. ४३१, ४३३ (प्रज्ञालोक, अंक २, वर्ष २, १८.८.१९५९)