संपादकीय : भारत-फ्रान्स संबंध : नवे पर्व !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

आतापर्यंत भारताचे जगातील अनेक देशांपैकी इस्रायल, रशिया आणि त्यापाठोपाठ फ्रान्ससमवेत दळणवळण, व्यापार, संरक्षण अन् उद्योग यांमध्ये घनिष्ठ संबंध राहिले आहेत. भारताने प्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना भारतातील प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते; मात्र त्यांनी ते नाकारले. त्यानंतर भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रजासत्ताकदिनाचे निमंत्रण दिले. त्यामुळे मॅक्रॉन हे २६ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘परेड’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. मॅक्रॉन हे भारतातील प्रजासत्ताकदिन परेडचे प्रमुख पाहुणे असलेले फ्रान्सचे सहावे राष्ट्राध्यक्ष असतील. वर्ष १९७६ पासून भारताने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना जवळजवळ ५ वेळा प्रजासत्ताक दिनासाठी आमंत्रित केले आहे. १४ जुलै २०२३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे परेड’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या परेडमध्ये सहभागी होणारे ते दुसरे भारतीय पंतप्रधान होते. परेडमध्ये भारतीय राफेल विमानांनी उड्डाण केले होते. भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या ‘मार्चिंग’ तुकडीचे २६९ सैनिकही परेडमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हेही ‘बॅस्टिल डे परेड’मध्ये सहभागी झाले होते. परेड चालू होण्यापूर्वी मॅक्रॉन यांनी नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले होते.

फ्रान्स-भारत मैत्रीपूर्ण संबंध !

मॅक्रॉन यांनी मार्च २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. सप्टेंबर २०२३ मध्येही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ‘जी-२०’ शिखर परिषदेसाठी देहली येथे पोचले होते. या वेळी मोदी आणि मॅक्रॉन यांच्या द्विपक्षीय बैठकीत इस्रायल-हमास युद्ध, लाल समुद्रातील हुती आक्रमणे, तसेच दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारी आणि ‘ईयू’ व्यापार करारावर चर्चा होऊ शकते.

फ्रान्सची प्रशंसा करतांना मोहनदास गांधी म्हणाले होते, ‘स्वातंत्र्य’, ‘समानता’ आणि ‘बंधुता’ या ३ शब्दांचे सामर्थ्य समजावून सांगणारा देश’ आहे.’ ज्या काळात बहुतेक देश भारताकडे केवळ वसाहतवादी वर्चस्वाच्या दृष्टीकोनातून पहात होते, तेव्हा फ्रान्सचे नोबेल पारितोषिक विजेते रोमेन रोलँड यांनी ‘भारत ही आपल्या संस्कृतीची जननी आहे’, असे म्हटले होते. भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्रीचा प्रारंभ जुलै १९९८ मध्ये पोखरणमध्ये भारताने अणूचाचणी केल्यापासून झाला आहे. याला विरोध दर्शवत अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी भारतावर अनेक निर्बंध लादले होते. त्या वेळी भारताला पाठिंबा देणारा फ्रान्स हा पश्चिमेकडील एकमेव देश होता. त्या वेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी भारताला पाठिंबा दिला होता. पाश्चात्त्य देशांप्रमाणे फ्रान्सने भारताला अणू प्रकल्प उभारण्यास साहाय्य केले. रशियानंतर फ्रान्स हा एकमेव देश आहे की, ज्याने भारताची आण्विक क्षमता वाढवण्यात साहाय्य केले आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा शस्त्र खरेदीदार आहे. त्याच वेळी फ्रान्स हा जगातील तिसरा सर्वांत मोठा शस्त्रास्त्रे विकणारा देश आहे. वर्ष २०१८ ते २०२२ पर्यंत भारताने फ्रान्सकडून ३० टक्के शस्त्रे खरेदी केली होती. भारत आणि फ्रान्स यांच्यातील वार्षिक व्यापार अनुमाने ९७ सहस्र कोटी रुपयांचा आहे. फ्रान्ससाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. फ्रान्स आणि भारत यांना कोणत्याही एका सूत्रावर एकमेकांचे सहकार्य नको आहे. जगाच्या विविध सूत्रांवर या दोघांमध्ये वर्षानुवर्षे चांगली भागीदारी आहे.

फ्रान्स हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. भारत अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पालट करण्याची मागणी करत आहे. ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेपासून जग पुष्कळ पालटले आहे’, असे भारताचे मत आहे. अशा स्थितीत जग चालवणार्‍या संस्थेत पालट आवश्यक आहे. ‘यू.एन्.’ने काही देशांच्या हुकुमांचे पालन करणे थांबवले पाहिजे. भारताच्या या मागण्यांना फ्रान्सचाही पाठिंबा आहे. दुसरीकडे, भारताने ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’मध्ये स्थायी सदस्यत्वाची मागणी केली आहे. फ्रान्सने याविषयी भारताची बाजू घेतली आहे. भारताप्रमाणेच फ्रान्सही बहुध्रुवीय जगाचा समर्थक आहे. याचा अर्थ दोन्ही देश कोणत्याही एका देशाला जगावर वर्चस्व गाजवू देणार नाहीत. याचे ताजे उदाहरण म्हणजे फ्रान्सने चीनविषयी अमेरिकेच्या विरुद्ध घेतलेली भूमिका ! ‘नाटो’चा सदस्य असूनही फ्रान्सने चीनविषयी अमेरिकेच्या सूचनांचे पालन करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. तैवानविषयी अमेरिकेच्या धोरणांना फ्रान्सचाही पाठिंबा नाही. भारताविषयी बोलायचे झाले, तर शीतयुद्धाच्या काळापासून भारत कोणत्याही एका छावणीचा समर्थक असण्याचा विरोध करत आहे. भारताने फ्रान्सकडून ३६ ‘राफेल’ लढाऊ विमाने घेतली आहेत. भारतातील मानवी हक्क आणि लोकशाही यांविषयी अमेरिका, ब्रिटन अन् जर्मनी यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करतांना आपण पाहिले आहे. त्या तुलनेत फ्रान्स भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये पुष्कळ अल्प हस्तक्षेप करतो. भारताचे फ्रान्सशी कधीही मोठे मतभेद नसण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या समुद्रात घेतलेल्या उडीला ८ जुलै २०१० या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने मार्सेलिस बंदरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारण्यास फ्रान्स शासनाने अनुमती दिली आहे; मात्र हा प्रस्ताव केंद्रशासनाकडे तब्बल ११ वर्षे पडून होता. अद्यापही त्यास अनुमती नाही. तो या निमित्ताने लवकरात लवकर पूर्ण व्हावा, ही अपेक्षा !

फ्रान्समधील इतिहास शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण गाजत असतांनाच फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या चाकू आक्रमणात ३ जणांचा बळी गेला, तेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पहिल्या आक्रमणानंतर इस्लामी कट्टरतावाद्यांविषयी कठोर भूमिका घेतलेली आहे. ‘शार्ली हेब्दो’ मासिकाने वर्ष २०१५ मध्ये महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यानंतर या मासिकाच्या कार्यालयावर धर्मांधांनी आक्रमण केले होते. हेच व्यंगचित्र वर्गामध्ये दाखवणार्‍या सॅम्युअल पॅटी या शिक्षकाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ‘आपण अशा प्रकारच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, शिक्षकाची हत्या म्हणजे इस्लामी अतिरेक्यांचे आक्रमण आहे’, असे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या शिक्षकाला श्रद्धांजली वहातांना म्हटले होते. अनेक वर्षांपासून इस्लामिक आतंकवादाविरुद्धच्या लढाईतही भारत आणि फ्रान्स दोन्ही देश एकत्र उभे आहेत. फ्रान्सही धर्मांधांचा उद्दामपणा अजिबात खपवून घेत नाही. फ्रान्स धर्मांधांना योग्य तो धडा शिकवतोच, हे फ्रान्समधील मशिदीविषयी फ्रान्सने घेतलेल्या भूमिकेवरून लक्षात येते. यातून भारताने फ्रान्सचा बाणेदारपणा शिकून घेतला पाहिजे. २६ जानेवारीनंतर भारत-फ्रान्स संबंधांचे नवे पर्व परराष्ट्रनीतीच्या दृष्टीने यशस्वी ठरो, ही अपेक्षा !

‘आपले स्वातंत्र्य कधीच हिरावून घेतले जाणार नाही’, या भ्रमापेक्षा सतर्क रहा !