वेद हीच जगाची मूलघटना होय !

१. ईश्‍वराकडून सर्वज्ञानपूर्वक विश्‍वाची उत्‍पत्ती !

‘वैदिकांची अशी श्रद्धा आहे की, या विश्‍वाची घटना (विधान) सनातन म्‍हणजे शाश्‍वत, निश्‍चित आहे. नवीन विधान बनवण्‍याची आवश्‍यकता नाही. हे जगत् जड परमाणूंनी, विद्युत्‌कणांनी किंवा केवळ जड प्रकृतीने बनलेले नाही. रेल्‍वे, तारायंत्र, रेडिओ, विमान, टँक, तोफा, मशीनगन्‍स, अ‍ॅटमबाँब इत्‍यादी सामान्‍य वस्‍तू निर्माण करण्‍यासही जर बुद्धीमान, मेंदूयुक्‍त मानव लागतो, तर मग आकाश, वायू, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, पर्वत, समुद्र, शुक, मयूर, हंस, वने, लता, पुष्‍पगुच्‍छ इत्‍यादींनी परिपूर्ण असे हे भूमंडळ, त्‍याचप्रमाणे मानव, त्‍याची इंद्रिये, मन, बुद्धी, मेंदू, शरीर इत्‍यादी विविध प्रकारच्‍या वस्‍तूंनी भरलेला प्रपंच बनवणारापण चेतन आणि सर्वज्ञ असाच असला पाहिजे. चेतन व्‍यक्‍ती कार्य करतांना ते बुद्धीपूर्वकच करू शकते. दंड, चक्र, चीवरादि सामुग्री मिळवून घट बनवणारा कुंभार घटज्ञानपूर्वकच घटाची निर्मिती करतो. घटोत्‍पत्तीपूर्वीच त्‍या घटाचे ज्ञान त्‍या कुंभाराला असते. त्‍याचप्रमाणे ईश्‍वरसुद्धा सर्वज्ञानपूर्वक अशीच या विश्‍वाची उत्‍पत्ती करतो. त्‍याच्‍या या सर्वज्ञानांत सूक्ष्म शब्‍दांचाही अनुवेध मानावा लागतो.

२. ‘वेद’च या विश्‍वाचे विधान !

‘न सोऽस्‍ति प्रत्‍ययो लोके यः शब्‍दानुगमादृते ।’ (वाक्‍यपदीय, काण्‍ड १, श्‍लोक १३१) म्‍हणजे ‘शब्‍दाने संबद्ध झाल्‍याविना संभव आहे, असे कोणतेही ज्ञान या जगात नाही.

याच दृष्‍टीने ईश्‍वराच्‍या सृष्‍टीरचनेच्‍या मूलभूत विज्ञानातही कोणत्‍या तरी शब्‍दांचा अनुवेध असलाच पाहिजे. हे सूक्ष्म शब्‍द म्‍हणजेच वेद होत. वेदच या विश्‍वाचे विधान म्‍हणजे घटना होय !’’

३. परमेश्‍वराने केलेली अद़्‍भुत उत्‍पत्ती !

‘एत’ शब्‍दोच्‍चाराने देवांना, ‘असृग्रम्’ शब्‍दाने मानवांना, ‘इन्‍दव’ शब्‍दाने पितरांना, ‘तिरःपवित्रम्’ शब्‍दाने ग्रहांना आणि ‘भूः’ शब्‍दाने पृथ्‍वीला उत्‍पन्‍न केले.

स भूरिति व्‍याहरत् । स भूमिमसृजत ।

– तैत्तिरीयब्राह्मण, काण्‍ड २, प्रपाठक २, खण्‍ड ४, अनुवाक २

अर्थ : त्‍याने (परमात्‍म्‍याने) ‘भूः’ शब्‍द उच्‍चारला आणि पृथ्‍वीची निर्मिती केली.

एते इत्‍येव प्रजापतिर्देवानसृजत । असृग्रमिति मनुष्‍यान् । इन्‍दवः इति पितृन् । तिरःपवित्रमिति ग्रहान् । आशवः इति स्‍तोमान् । विश्‍वानीति शास्‍त्रम् । अभिसौभगेत्‍यन्‍याः प्रजाः ।

– जैमिनीय ब्राह्मण, कांड १, कंडिका ९४

अर्थ : प्रजापतीने ‘एते’पासून देवतांची, ‘असृग्रम्’पासून मनुष्‍यांची आणि ‘इन्‍दवः’पासून पितरांची निर्मिती केली. ‘तिरःपवित्रम्’ शब्‍दाने ग्रहांना निर्माण केले, तर ‘आशवः’ शब्‍दाने यज्ञांची निर्मिती केली. ‘विश्‍वानि’ या शब्‍दापासून शास्‍त्रांची, तर ‘अभिसौभग’ या शब्‍दापासून अन्‍य प्रजा निर्माण केली.

अशा प्रकारे ज्ञानपूर्वक आणि शब्‍दपूर्वक सृष्‍टी निर्मिती होते.

४. घटनेविना विश्‍वोत्‍पत्ती नाही !

लहान राष्‍ट्र चालवण्‍यासाठीही शासनव्‍यवस्‍था असावीच लागते, मग या अनंत ब्रह्मांडयुक्‍त जगताचे शासन व्‍यवस्‍थेच्‍या योजनेविना कसे चालेल ? एका बोटाएवढीसुद्धा भूमी, प्रकाशाचा एखादा किरण, वृक्ष, उद्यान, कूप, सरोवरादी जर शासक आणि मालक यांविना नाहीत, तर मग सूर्य, चंद्र, नक्षत्रे, वन, पर्वत, सागर आणि अनंत ब्रह्मांडे शासक अन् मालक यांविना कशी असतील ? या प्रकारे सृष्‍टीचीही शासनव्‍यवस्‍था असली पाहिजे.

५. हिंदूंचा सनातन वैदिक धर्म कोणता ?

वेद

बहुसंख्‍य भारतीय आजही आस्तिक म्‍हणजे वेदास प्रमाण मानणारे असल्‍यामुळे ते वेदाला विश्‍वाचे विधान मानतात. सनातन परमात्‍म्‍याने, सनातन जिवात्‍म्‍याच्‍या, सनातन अभ्‍युदयासाठी आणि परस्‍पर प्राप्‍ती करून देण्‍यासाठी आपले निःश्‍वासभूत आणि नित्‍यविज्ञानानुविद्ध अशा सनातन वेदाद्वारे जो सनातन मार्ग निर्धारित केला आहे, तोच हिंदूंचा ‘सनातन वैदिक धर्म आहे.’

६. स्‍मृतीकारांत परस्‍पर भेद नाही !

काही लोक म्‍हणतात, ‘स्‍मृती, पुराणे आणि निरनिराळे ऋषी यांच्‍या भिन्‍न भिन्‍न उक्‍ती अन् वचने पहाता देशकालस्‍थितीला अनुसरून शास्‍त्र आणि नियम पालटतात’, असे मानावेच लागते.’’ निरनिराळ्‍या स्‍मृतीकारांनी आपल्‍या देशकालस्‍थितीला अनुसरून धारण-पोषणानुकूल जे नियम बनवले, तेच धर्मशास्‍त्र होय.’

स्‍मृती अनेक असल्‍या, तरी त्‍या वेदांनुसारच लिहिल्‍या गेल्‍या आहेत. ज्‍याप्रमाणे आजही संकट आणि अल्‍पसंकट यांची सर्व कल्‍पना अन् अनुमान काढूनच राज्‍याची घटना बनवली जाते. परमेश्‍वराच्‍या नित्‍यविधानातही सर्व प्रकारचे देश, काल आणि परिस्‍थिती यांचा विचार केला गेला आहे. भेद इतकाच आहे की, व्‍यवहारातील घटना निर्माण करणारे लोक अल्‍प असतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍या निर्मितीत चुका राहू शकतात. ईश्‍वरकृत विधानात कोणतीही चूक नसते; कारण ईश्‍वर सर्वज्ञ आहे; म्‍हणूनच आपत्ती, संपत्ती, काल, देश स्‍थिती इत्‍यादी भेद लक्षात घेऊन वेदांत जे सूक्ष्म आणि विप्रकीर्णरूप धर्म सांगितले गेले आहेत, त्‍यांचेच संकलन करून स्‍मृतीग्रंथ रचले गेले आहेत.

७. ईश्‍वराच्‍या अस्‍तित्‍वामुळे हिंदूंचे विधान ‘वेद’च !

श्रुतेरिवार्थं स्‍मृतिरन्‍वगच्‍छत् ’ (रघुवंश, सर्ग २, श्‍लोक २)

अर्थ : स्‍मृतीग्रंथ वेदांनी सांगितलेल्‍या अर्थाचे अनुसरण करतात.

आज जर कुणी एखादा वेदांविरुद्ध नवी स्‍मृति बनवू लागला, तर ती कधीही मान्‍य होणार नाही. आजपर्यंत चालू असलेला ‘हिंदु लॉ’ (हिंदु कायदा) प्रायः मिताक्षरा, दायभाग, मनु, याज्ञवल्‍क्‍य आणि वेद यांच्‍या आधारावरच सिद्ध केला आहे. अजूनपर्यंत उच्‍च न्‍यायालयातून किंवा प्रिव्‍ही कौन्‍सिलातून स्‍मृतीवचनांच्‍या अर्थानेच निर्णय दिले जात होते आणि दिले जात आहेत. मनसोक्‍त निर्णय दिले जात नसत अणि नाहीत. याचाच अर्थ हा आहे की, हिंदूंचे विधान ‘वेद’ हेच आहेत. जोपर्यंत ईश्‍वर मृत पावत नाही किंवा आपला अधिकार त्‍याने कुणाच्‍या हातात सोपवला नाही किंवा त्‍याचा कुणी पराभव केला नाही किंवा तन्‍ननिर्मित विधानांत चुका सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्‍याच्‍या विधानांत परिवर्तन करण्‍याचा अधिकार कुणालाच मिळू शकत नाही. ईश्‍वर हा नित्‍य, सर्वज्ञ आणि सर्वशक्‍तीमान आहे; म्‍हणूनच पूर्वोक्‍त प्रमाद तेथे संभवत नाहीत. अर्थात् त्‍याच्‍या विधानात कोण पालट करू शकेल ?

ईश्‍वरासच अनंत कोटी ब्रह्मांडाचे पूर्ण ज्ञान आहे. ईश्‍वराने केलेले विधानच (वेदरूप) धर्माधर्म निर्णयात प्रमाण आहे; म्‍हणूनच हिंदू वेद आणि वेदानुसारी आर्य धर्मग्रंथांना आपले विधान मानतात. त्‍या विधानांत परिवर्तन करण्‍याचा कुणाचाही अधिकार ते मान्‍य करत नाहीत. ईश्‍वर आणि त्‍याचे राम, कृष्‍णादि किंवा वसिष्‍ठ, मन्‍वादि अवतारसुद्धा त्‍यांच्‍या उपदेशाचे पालन करतात. त्‍यात परिवर्तन करण्‍याचा अधिकार त्‍या अवतारी विभूतीनांही नाही; म्‍हणूनच निःश्‍वासभूत ईश्‍वराची बुद्धी आणि प्रयत्न यांविना उत्‍पन्‍न झाल्‍यामुळे वेदांत अकृत्रिम आणि अपौरुषेयता सिद्ध झाली आहे. कुणालाही त्‍याविरुद्ध विधान बनवण्‍याचा अधिकार नाही.

८. नियम डावलून मुसलमान, ख्रिस्‍ती यांच्‍या नव्‍हे, तर केवळ हिंदु धर्मातच हस्‍तक्षेप केला जाणे

प्रत्‍येक राष्‍ट्र आणि आंतरराष्‍ट्रीय जगत यांचा हा नियम आहे की, कोणत्‍याही शासनसंस्‍थेने धर्मात हस्‍तक्षेप करू नये. संयुक्‍त राष्‍ट्रसंघाचीही तशीच घोषणा आहे. भारत सरकारच्‍या नवनिर्मित घटनेतही ‘सरकार कुणाच्‍याही धर्मात हस्‍तक्षेप करणार नाही’, असे मान्‍य केले आहे. इतकेच कशाला; पण मुसलमान, ख्रिस्‍ती यांच्‍या धर्मात हस्‍तक्षेप न करण्‍याचे धोरणही सरकार पाळत आहे; परंतु हिंदूंच्‍या धर्मात हस्‍तक्षेप केला जात नसल्‍याचे भासवण्‍यासाठी विवाह, दायमागादि धर्म, धर्म नसून ‘ती केवळ सामाजिक व्‍यवस्‍था आहे’, असा खोटा प्रचार केला जातो. त्‍या त्‍या धर्माची व्‍यवस्‍था त्‍या त्‍या संप्रदायांच्‍या धर्मग्रंथांवरून आणि धर्माचार्यांनीच करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे हिंदु धर्माची व्‍याख्‍या केल्‍यास त्‍यातून लक्षात येईल की, ‘हिंदुकोड’ यासारख्‍या कायद्यांच्‍या योगाने हिंदु धर्मावर आक्रमण केले गेले आहे कि नाही ? गोवधासारखी निंद्य आणि राष्‍ट्रघातकी अधर्म्‍य कृती मुसलमानांच्‍या धर्मभावना बिघडतील म्‍हणून बंद केली जात नाही; परंतु विवाह, दायमाग, मंदिरमर्यादा या शुद्ध धार्मिक गोष्‍टी सामाजिक म्‍हणवल्‍या जाऊन त्‍यांच्‍या नावाखाली धर्मावर बलात्‍काराने नित्‍य आक्रमण केले जात आहे, हे खेदजनक आहे.

– वीतराग श्रीकरपात्रीजी महाराज (साभार : ग्रंथ ‘भारतीय-वाङ्‍मय-माला’, ५.४.१९५४)