नमो नवमतदाता संमेलनात पंतप्रधानांचा युवा मतदारांशी संवाद

दी यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग येथे कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी – राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित ‘नमो नवमतदाता संमेलन’ कार्यक्रमात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नवमतदार युवक-युवतींशी ऑनलाईन संवाद साधला. देशभरात साधारण ५ सहस्र ठिकाणी हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. रत्नागिरीतील ‘दी यश फाऊंडेशनच्या नर्सिंग कॉलेज’मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवीन मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी देहलीहून या कर्यक्रमाचे प्रास्ताविक करत शुभारंभ केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे.पी. नड्डा यांनी युवा मतदारांना मार्गदर्शन केले आणि मतदानाचे महत्त्व विशद केले. यानंतर दाखवण्यात आलेल्या चित्रफितीमधून नरेंद्र मोदी सरकारच्या विकासकामांची झलक दाखवण्यात आली आणि विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधतांना इतक्या मोठ्या संख्येने युवकांशी संवाद साधणारा जगातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे नमूद करत युवाशक्तीची जाणीव करून दिली. लोकशाहीला आणि त्यायोगे देशाला सशक्त करण्यासाठी मतदानाचे कर्तव्य निभावण्याचे आवाहन त्यांनी युवा मतदारांना केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग नोंदवत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याची प्रतिज्ञा केली.