श्री. संदीप मालपेकर यांचा पोलिसांकडून सत्कार

राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध सुवर्णकार संदीप मालपेकर यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीतील संशयित आरोपी पोलिसांच्या कह्यात

संदीप मालपेकर

राजापूर, २४ जानेवारी (वार्ता.) – २० जानेवारी या दिवशी रात्री शहरातील भटाळी येथे विजयकुमार पंडित यांच्या घरी दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असतांनाच राजापूर पोलिसांनी शहरातील सर्व सुवर्णकारांना एक ‘नोटीस’ वजा सूचनापत्रक दिले होते. या सूचनापत्राची नोंद घेत राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष आणि शहरातील प्रतिथयश ए.डी. मालपेकर ज्वेलर्सचे मालक श्री. संदीप मालपेकर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि सामाजिक माध्यामाचा योग्य वापर केल्यामुळे आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले. या उत्तम कामगिरीसाठी विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी श्री. संदीप मालपेकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन राजापूर पोलीस ठाण्यात सत्कार केला. याविषयी श्री. संदीप मालपेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पोलिसांनी पाठवलेल्या सूचनापत्रात चोरीतील माल जर कुणी विकण्यासाठी आला, तर त्याची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांचे हे पत्र श्री. मालपेकर यांना मिळताच त्यांनी समयसूचकता दाखवत रत्नागिरी जिल्हा सुवर्णकार संघटनेच्या ‘व्हॉटसॲप’ गटावर पाठवले. त्यामुळे राजापूर पोलिसांचे हे आवाहन संपूर्ण जिल्हाभरातील सुवर्णकारांपर्यंत पोचले. या कालावधीत आरोपीने हे चोरलेले दागिने रत्नागिरीतील एका खासगी बँकेत गहाण ठेवण्यासाठी दिले, तेथून मूल्यांकनासाठी हे दागिने सोनाराकडे पाठवण्यात आले. मूल्यांकनासाठी आलेले दागिने हे राजापूर येथील चोरीतील असल्याचा दाट संशय आल्याने रत्नागिरीतील सुवर्णकारांनी श्री. संदीप मालपेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मालपेकर यांनी तात्काळ राजापूर पोलिसांना याविषयी कळवले, तसेच पोलिसांकडून पंडित यांना या दागिन्यांचे ‘फोटो’ दाखवून हे दागिने त्यांचे आहेत का ? याविषयी खात्री करण्यात आली. दागिन्यांची ओळख पटताच रत्नागिरी आणि राजापूर पोलिसांनी संशयीत आरोपी सुमेध कुळकर्णी याला  मुद्देमालासह अटक केली.