Ram Mandir Hanuman Darshan : अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या दर्शनाला आले वानर !

श्री हनुमानच दर्शनासाठी मंदिरात आल्याची अयोध्येत चर्चा !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एक वानर मंदिराच्या गर्भगृहात आल्याची घटना घडली. हे वानर काही वेळ गाभार्‍यात शांतपणे बसले. ते मूर्तीकडे पहात होते आणि नंतर ते निघून गेले. वानरामुळे ‘मंदिरात श्री हनुमान आले’ अशी चर्चा अयोध्येत चालू झाली.

आम्ही रामाची मूर्ती आणि हनुमान यांचे दर्शन घेतले – रामभक्तांची श्रद्धा

आज श्री रामजन्मभूमि मंदिर में हुई एक सुंदर घटना का वर्णन:

१. या घटनेची माहिती ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने त्याच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करून दिली; मात्र या वेळी कोणतेही छायाचित्र देण्यात आले नाही. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज (२३ जानेवारीला) श्रीरामजन्मभूमीवरील मंदिरात एक सुंदर घटना घडली. संध्याकाळी ५.५० च्या सुमारास एक वानर दक्षिण द्वारातून गाभार्‍यात आले. त्यानंतर हे वानर उत्सवमूर्तीच्या जवळ पोचले. सुरक्षारक्षकांनी वानर मंदिरात शिरल्याचे पाहिले आणि ते धावले. त्यांना वाटले की, हे वानर मूर्तीला काही करणार तर नाही ना? मात्र हे वानर काही वेळ मूर्तीसमोर बसले आणि उत्तर दरवाजातून निघून गेले. त्या वानराने काहीही हानी केली नाही. सुरक्षारक्षकांमध्ये चर्चा होऊ लागली की, रामरायाचे दर्शन घेण्यासाठी श्री हनुमानच आले आहेत.

२. ज्या भाविकांनी हे दृश्य पाहिले ते स्वतःला भाग्यवान समजत आहेत. ‘आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण होता की, आम्ही रामाची मूर्ती आणि हनुमान यांचे दर्शन घेतले’, असे ते म्हणत होते.