कोट्यवधी जिवांचे लौकिक आणि पारमार्थिक कल्याण करणार्‍या श्रीरामाच्या चरणी महर्षि अगस्ती आणि भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी वाहिलेल्या भावपुष्पांजलीविषयी साधिकेने सांगितलेली भावसूत्रे !

संपूर्ण विश्वाला वंदनीय असणार्‍या श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या आणि सप्त मोक्षधामांपैकी एक असलेल्या अयोध्या नगरीत प्रभु श्रीरामरायाच्या भव्य मंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामलला विराजमान झाले आहेत. (अयोध्या, मथुरा, मायावती (हरिद्वार), काशी, कांची, अवन्तिका (उज्जैन) आणि द्वारका या ७ मोक्ष प्रदान करणार्‍या नगरी आहेत.)

१. कोट्यवधी जीव श्रीरामाने दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत लौकिक आणि पारमार्थिक कल्याण करून घेत असणे

श्रीमती कमलिनी कुंडले

‘गेल्या पाच शतकांतील मिट्ट काळोखाचा विनाश होऊन या रामप्रहरीची तेजोमय प्रभा संपूर्ण विश्वाला रामप्रकाशित करणार आहे’, या विचारानेच माझे मन भरून आले. त्रेतायुगापासून ते आतापर्यंत अनेक महर्षि, ऋषी-मुनी, संत, भक्त आदींनी प्रभु श्रीरामाचे जे गुणगान केले आहे, त्याचे स्मरण झाले. सर्व पाप-महापाप आणि प्रसंगी पापी यांचाही नाश करणार्‍या प्रभु श्रीरामरायाचे अविनाशी नाम अन् रूपाचे ज्ञान त्याच्या अकारण करुणाकर स्वभावामुळे आम्हा पामरांवर असलेल्या त्यांच्या असीम कृपेमुळेच आम्हाला नित्य नव्या रूपात होत असते. त्यामुळे आजही कोट्यवधी जीव श्रीरामाने दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत लौकिक आणि पारमार्थिक कल्याण करून घेत आहेत.

त्या सर्व महर्षि, ऋषी-मुनी, संत, भक्त यांच्या आणि आत्माराम यांच्या माध्यमातून संपूर्ण चराचरातील प्राणीमात्रांच्या रूपाने या ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या प्रभूच्या सुकोमल आणि पतितपावन चरणी विश्वातील सर्व प्राणीमात्रांच्या वतीने अनंत कोटी नमस्कार ! पुनःपुन्हा नमस्कार ! वारंवार नमस्कार !

२. महर्षि अगस्ती आणि भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी शब्दब्रह्मरूपी भावपुष्पांच्या माध्यमातून केलेली प्रभु श्रीरामाची आराधना !

या सुमंगलप्रसंगी प्रातिनिधिक रूपात महर्षि अगस्ती आणि भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी ज्या शब्दब्रह्मरूपी भावपुष्पांच्या माध्यमातून प्रभूची आराधना केली आहे, त्यातीलच काही भावपुष्पांची ही ओंजळ श्रीरामाच्या चरणकमली समर्पित करत आहे.

२ अ. महर्षि अगस्तींचा प्रभु श्रीरामाविषयी दिव्य वात्सल्यभाव !

महर्षि अगस्ती ‘आदित्यहृदय’स्तोत्रात प्रभु श्रीरामाला म्हणतात,

राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनम् ।
येन सर्वानरीन् वत्स समरे विजयिष्यसे ।।’

– आदित्यहृदय स्तोत्र, श्लोक ३

अर्थ : महर्षि अगस्ति श्रीरामाला म्हणतात, ‘‘सर्वांच्या हृदयात वास करणार्‍या महाबाहू श्रीरामा, या गोपनीय सनातन स्तोत्राचे तू श्रवण कर. वत्सा, या स्तोत्राच्या श्रवणाने तू युद्धात सर्व शत्रूंवर विजय प्राप्त करशील.’’

महर्षि अगस्ती प्रभूला ‘राम ! राम !’ असे अत्यंत प्रेमाने दोन वेळा संबोधित करतात. त्यांच्या त्या प्रासादिक वाणीतील आत्मियता काळजाला भिडते. त्यांनी उच्चारलेल्या ‘वत्स’ या शब्दातून त्यांच्या हृदयातून पाझरणारा प्रभूप्रतीचा दिव्य वात्सल्यभाव केवळ अवर्णनीयच आहे. ‘खरेतर प्रभु श्रीराम हा भगवान श्रीविष्णूचा अवतार आहे. त्याच्याच हातून रावणाचा वध होणार आहे. एवढेच नव्हे, तर रावणवधासाठीच भगवंताने हा अवतार धारण केला आहे आणि या युद्धात प्रभु श्रीरामच विजयी होणार आहे’, हे त्रिकालदर्शी महर्षींना ठाऊक असूनही त्यांना राम-रावण युद्धप्रसंगी सुकुमार प्रभु श्रीरामाविषयी वाटणारी काळजी, जिव्हाळा, दिव्य वात्सल्यभाव आणि प्रीती माझ्यासारख्या असंवेदनशील आणि मूढमती जिवालाही हृदयात इतक्या उत्कटतेने जाणवते की, माझे डोळे अनायासे भावाश्रूंनी भरून येतात.

२ आ. भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी दोह्यांत वर्णिलेला रामनामाचा महिमा !

२ आ १.
एक छत्रु एक मुकुटमनि, सब बरननि पर जोउ ।
तुलसी रघुबर नाम के, बरन बिराजत दोउ ।।

भावार्थ : ‘प्रभूच्या ‘राम’ या नावातील पहिले अक्षर ‘र’ आहे. त्याचे कौतुक मी काय सांगू ! ‘र’ म्हणजे रफार. जो कुठल्याही अक्षरावर जेव्हा तुम्ही लिहिता, तेव्हा तो सर्वच वर्णाक्षरांवर छत्रीसारखा शोभायमान दिसतो. तसेच दुसरे अक्षर ‘म’ हे अनुस्वाराच्या रूपात सर्व अक्षरांवर अगदी मुकुटमण्यासारखे मनोरम दिसते. त्यामुळे या तुलसीदासाला वाटते की, ‘सर्व चराचरावर प्रभूची छत्रछाया आहे आणि याच मनोरम रामनामाने संपूर्ण ब्रह्मांडही व्यापले आहे.’

२ आ २.

ब्रह्म राम तें नामु बड, बर दायक बर दानि ।
राम चरित सत कोटि महँ, लिय महेस जियँ जानि ।।,

भावार्थ : प्रभु श्रीराम शिवाची नित्य पूजा करतो, तर शिव श्रीरामाला आपले आराध्य मानतो. याला अनुलक्षून गोस्वामीजी म्हणतात, ‘निर्गुण ब्रह्म आणि सगुण रूपातील श्रीराम अवतार यांपेक्षाही ‘रामनाम’ अतीश्रेष्ठ आहे; कारण ते वर देणार्‍या देवतांनाही वर देणारे आहे. हे रहस्य जाणूनच देवाधिदेव महादेवाने शंभर कोटी श्लोक असणार्‍या श्रीरामचरित्रातील निवडक अशी केवळ दोनच ‘राम’ ही अक्षरे आपल्या हृदयात धारण केली आहेत.

२ आ ३.

सबरी गीध सुसेवकनि, सुगति दीन्हि रघुनाथ ।
नाम उधारे अमित खल, बेद बिदित गुन गाथ ।।

भावार्थ : प्रभु श्रीरामाने केवळ शबरी आणि गिधाडराज जटायु या आपल्या भक्तांनाच मुक्ती दिली; परंतु रामनामाने मात्र अनेक दुर्जनांचाही उद्धार केला असल्याची गुणगाथा वेदांमध्ये वर्णिलेली आहे.

२ आ ४.

राम नाम मनिदीप धरु, जीह देहरीं द्वार ।
तुलसी भीतर बाहेरहुँ, जौं चाहसि उजिआर ।।

भावार्थ : तुलसीदास स्वतःलाच म्हणतात, ‘हे तुलसी, जर तुला आत आणि बाहेरही प्रकाश म्हणजे प्रापंचिक अन् पारमार्थिक ज्ञान हवे असेल, तर तू तुझ्या मुखरूपी उंबरठ्यावर कशामुळेही आणि कधीही न विझणारा असा अविनाशी दिव्य प्रकाशमय रामनामरूपी रत्नदीप ठेव. त्यामुळेच तुझे लौकिक आणि पारलौकिक कल्याण होईल.’

राम ! राम !’

– श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (२१.१२.२०२३)