सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दापोलीत सकल हिंदु समाजाच्या वतीने भव्य गजराज शोभायात्रा !

दापोली – अखिल हिंदुस्थानामध्येच नव्हे, तर संपूर्ण विश्वामध्ये एकवचनी, एकबाणी, सत्यवचनी असे प्रभु श्री रामचंद्र यांचा वनवास खर्‍या अर्थाने आता संपला आहे. गेली अनेक वर्षे जतन केलेल्या स्वप्नासाठी कारसेवकांनी कारसेवेच्या माध्यमातून गाजवलेले शौर्य आणि केलेल्या त्यागामुळे अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्री रामललामूर्ती स्थानापन्न होऊन तिची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. याच निमित्ताने दापोलीत २२ जानेवारी या दिवशी येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने भव्य गजराज शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा जालगाव येथील श्री भैरी मंदिरापासून चालू झाली असून वडाचा कोंड, बुरोंडी नाका, फॅमिली माळ, मारुति मंदिर, प्रभुआळी, एस्.टी. स्टँड आणि शेवटी शिवतीर्थ या मार्गावर काढण्यात आली.

काही रामभक्तांनी ‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ घेतली होती. अशीच इच्छा दापोलीतील श्री. अक्षय फाटक यांच्या वडिलांनी पूर्वी व्यक्त केली होती. मधल्या काळात श्री. अक्षय यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री. अक्षय फाटक यांनी हत्तीवरून साखर वाटली. (असे शेकडो कारसेवक, रामभक्त यांची इच्छा आणि श्रीरामाची कृपा यांमुळे आज श्री रामललाची मूर्ती मंदिरात विराजमान झाली आहे ! – संपादक)