अयोध्या येथील श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा – अखिल विश्वातील रामभक्तांसाठी आनंदोत्सव आणि सुवर्णाक्षरांत लिहिले जाणारे क्षण !

‘अखिल विश्वातील लोक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होते, तो दिव्य क्षण २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याने अनुभवता आला. (श्री रामलला म्हणजे श्रीरामाचे बालरूप) लोकांना हा क्षण अनुभवण्यासाठी ५०० वर्षे वाट पहावी लागली. हिंदूंमधील श्रद्धेच्या अभावामुळे यासाठी इतका काळ लागला. याविषयी मला सुचलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारण्यासाठी श्रीरामानेच हिंदूंना शक्ती दिली असणे

श्री. अशोक रेणके

हिंदूंना ‘श्रीराममंदिर व्हावे’, यासाठी लढावे लागले आणि अनेक जणांनी त्यासाठी बलीदान केले; मात्र त्या विरांचे बलीदान व्यर्थ गेले नाही. श्रीरामाला हिंदूंची करुणा आली आणि त्याने हिंदूंना विजय मिळवून दिला. त्याने हिंदूंना श्रीरामजन्मभूमीवर भव्य राममंदिर उभारण्यासाठी शक्ती दिली. आपल्या परम भाग्यामुळेच आपण या शुभपर्वाचे साक्षीदार बनत आहोत.

२. त्रेतायुगात श्रीरामाने शबरीमातेला दर्शन देऊन उपकृत केले, त्याप्रमाणे समस्त हिंदूंना आशीर्वाद देण्यासाठी श्रीरामाचे आगमन होत असणे आणि श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हिंदूंनी भक्ती वाढवणे आवश्यक असणे

त्रेतायुगात रामभक्त शबरीमाता ‘श्रीराम कुटीत येणारच’ असा आर्तभाव ठेवून प्रतिदिन कुटीत येण्याच्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घालत होती. शबरीमातेला श्रीरामाची अनेक वर्षे वाट पहावी लागली. श्रीरामाने शबरीमातेला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. त्याचप्रमाणे श्रीरामाची आतुरतेने वाट पहाणार्‍या समस्त रामभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी श्रीरामाचे आगमन होत आहे. हा दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे. समस्त हिंदूंनी श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी सतत कृतज्ञताभावात राहून आणि शरणागत होऊन भक्ती वाढवावी.

३. श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी बलीदान देणार्‍या विरांप्रती हिंदूंनी कृतज्ञ रहाणे आवश्यक

हिंदूंना हा दिव्य क्षण सहजतेने लाभलेला नाही. श्रीराममंदिरासाठी बलीदान देणार्‍या सर्व ज्ञात आणि अज्ञात विरांचे आपल्यावर ऋण आहे. आपल्याला त्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यच आहे. श्रीरामाच्या आशीर्वादानेच आपल्याला रामजन्मभूमी पुन्हा मिळवता आली आणि भव्य मंदिर बांधता आले. श्रीरामाने तेथे सूक्ष्म रूपातून हे कार्य सिद्धीस नेले.

४. श्रीरामजन्मभूमी मुक्तीच्या कार्यातील संतांचे अतुलनीय योगदान !

४ अ. श्रीरामजन्मभूमीचा पुरावा सादर करतांना जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी वेदांचा संदर्भ देणे : श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देतांना सर्व पुरावे आणि साक्ष सादर केल्यानंतरही काही जण खोचकपणे प्रश्न उपस्थित करत होते. संतांनी त्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. श्रीरामजन्मभूमीचा पुरावा सादर करतांना जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी वेदांचा संदर्भ दिला. ते अंध आहेत, तरीही त्यांना हिंदूंच्या धर्मग्रंथांतील श्लोक संदर्भासहित मुखोद्गत आहेत. त्यांनी दिलेला वेदातील संदर्भ ऐकून न्यायाधीश निरूत्तर झाले. येथे संतांची महत्त्वाची भूमिका होती.

४ आ. रामजन्मभूमी मुक्तीच्या लढ्यात अनेक संतांनी सूक्ष्म स्तरावर लढा देणे आणि भारतात रामराज्य येण्यासाठी अथक परिश्रम करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! : रामजन्मभूमी मुक्तीच्या लढ्यात अनेक संतांनी सूक्ष्म स्तरावर कार्य केले. अनेक संतांनी पडद्याआड राहून कार्य केले. त्यांनी यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. ते त्यांची सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून कृतज्ञताभावात राहून आनंद घेतात. त्यातीलच एक महान द्रष्टे संत म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! ते ‘भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावे आणि भारतात रामराज्य यावे’, यासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांनी ‘काही वर्षांतच भारत हिंदु राष्ट्र घोषित होईल’, असे सांगितले आहे. ‘श्रीराममंदिराची स्थापना झाल्यावर देशात रामराज्य स्थापन व्हावे’, हेच त्यांचे ध्येय आहे.

५. श्रीराममंदिराचे रक्षण करणे आवश्यक !

श्रीराममंदिर उभारणीसाठी जसे सर्व हिंदू संघटित होऊन लढले, तसेच आता श्रीराममंदिराचे रक्षण करण्यासाठीही तितकेच कठीण परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विध्वंसक शक्तींचे कटकारस्थान थांबलेले नाही. ‘त्यांच्यापासून मंदिर सुरक्षित ठेवणे’, हे सर्वांचे दायित्व आहे.

६. अखिल विश्वातील रामभक्तांसाठी आनंदोत्सव !

श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा यांचे मंगलमय आनंदक्षण घडवून आणणारे रामजन्मभूमी ट्रस्टचे सर्व मान्यवर, संतगण आणि वैश्विक नेते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे. भारतासह जगातील अनेक देशांतील रामभक्त या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. अखिल विश्वातील रामभक्तांसाठी हा आनंदोत्सवच आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने) सुचलेली ही सूत्रे मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– श्री. अशोक रेणके (वय ६४ वर्षे), पाटणतळी, फोंडा, गोवा. (२१.१२.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.