रामायण मालिकेचा प्रभाव आणि प्रभु श्रीरामाच्या दैवी अस्तित्वाच्या साक्षात्कारी घटना !

दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्‍या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते. तेव्हाचे मर्यादित तंत्रज्ञान आणि भव्य रंगमंच उभारणे अन् पात्रांकडून भावपूर्ण अभिनय करवून घेणे पुष्कळ कठीण होते. या मोठ्या चित्रीकरणातील काही गोष्टी पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

रामायण मालिकेतील श्रीराम अन् लक्ष्मण यांना प्रसंग साकारून दाखवतांना रामानंद सागर

सध्याही कार्यरत असणारी श्रीरामाची वानर सेना

कारसेवकांचे रक्षण करणारी वानर सेना !

श्री. यज्ञेश सावंत

वर्ष १९९२ मध्ये अयोध्या येथे वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने कारसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे जात होते. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी कारसेवकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्याचा आदेश दिला होता, तर कारसेवकांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. ३० ऑक्टोबर या दिवशी मुलायमसिंह यांनी तर कहर करत कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. पोलीस दिसेल त्या कारसेवकावर गोळी चालवत होते. पोलिसांनी गोळीबार चालू केल्यामुळे कारसेवक पळत होते. काही कारसेवक बसमध्ये बसून अन्यत्र जाऊ लागले. या वेळी त्या बस रोखण्यासाठी काही अंतरावर बॅरिकेड्स लावल्याचे दिसले. तेव्हाच वानरांचा एक गट वेगाने पुढे जातांना दिसला. त्यांनी शेजारील विजेच्या खांबावर चढून तेथे लावलेल्या सर्व वायरी तोडून फेकल्या. तेव्हा कारसेवकांना समजले की, पोलिसांनी कारसेवकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्समध्ये विद्युत् प्रवाह सोडला होता आणि त्याचा धक्का बसून अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला असता; मात्र प्रभु श्रीरामाच्या वानरसेनेने कारसेवकांचे रक्षण केले.

अयोध्येच्या परिसरात पोचले शेकडो वानर, गिधाडे आणि साप !

श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर बांधून जसे पूर्ण होत असतांना गिधाडासारखे पक्षी समुहामध्ये अयोध्येच्या सीमेजवळ येत आहेत. हे पक्षी पूर्वी कधीही अयोध्येत दिसले नव्हते. हे पक्षी जवळपासच्या जंगलात आढळतात, असेही नाही. रामायणातील जटायूसारखे दिसणारे काही पक्षी अयोध्येच्या आकाशात उडतांना दिसत आहेत. गिधाडाच्या पाठोपाठ अयोध्येतील ग्रामीण भागांमध्ये नाग आणि साप दिसण्यात येत आहेत. केवळ १-२ नव्हे, तर समुहामध्ये हे नाग आणि साप दिसू लागले आहेत. विषारी साप अयोध्येजवळ आढळू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले, तरी काही लोक हे शुभलक्षण मानत आहेत. आतापर्यंत ९० हून अधिक साप आणि नाग अयोध्येमध्ये नागरी वस्तीत आढळून आले आहेत.

जेव्हापासून श्रीराममंदिराचे निर्माण कार्य चालू झाले आहे, तेव्हापासून माकडे, वानर यांचा समूह ज्या ठिकाणी निर्माण कार्य चालू असते, त्या ठिकाणी काही वेळासाठी येऊन जातो. वास्तविक या वानरांचा काम करणार्‍या कामगारांना त्रास होतो; मात्र ते काही करत नाहीत. ही माकडे आणि वानरे मोठ्या संख्येने मंदिराच्या आसपासच्या परिसरात दिसत आहेत. स्थानिकांची श्रद्धा आहे की, रामभक्त हनुमानही माकडे आणि वानरे यांच्या माध्यमातून श्रीराममंदिराच्या दर्शनासाठी येत असावेत. त्यामुळे स्थानिक नागरिक त्यांना हाकलत नाहीत.

गिधाडे, नाग, वानर यांच्या अयोध्येत येण्याला स्थानिक शुभसंकेत मानत आहेत. श्रीराममंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस जवळ येत असल्याने रामायणात उल्लेख असलेले असे प्राणी श्रीरामाच्या दर्शनाला येत आहेत. जे प्रभु श्रीरामाचे अस्तित्व नाकारत आहेत, त्यांना श्रीरामाच्या अस्तित्वाची अनुभूती देण्यासाठी आज या प्राण्यांच्या माध्यमातून दैवी संकेत मिळत आहेत. आज मिळणारे हे दैवी संकेत प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाचे अवतरण होऊन पुढच्या काळात रामराज्य अस्तित्वात येईल, त्या वेळी त्यांचे (अस्तित्व नाकारणारे) अस्तित्व कुठे असेल ? याचा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.

– श्री. यज्ञेश सावंत

१. काकभुशुंडीऋषींच्या चित्रीकरणाच्या प्रसंगी प्रत्यक्ष कावळा येणे

रामायणाच्या कथेतील एक प्रसंग आहे, तो म्हणजे काकभुशुंडीऋषि आणि श्रीरामाचे बालकरूप यांच्यात भेट ! या प्रसंगाचे चित्रीकरण कसे करता येईल ? याची ‘रामायण’ मालिकेचे निर्माते कै. रामानंद सागर आणि त्यांचे बंधू यांना चिंता होती. गुजरात येथे या मालिकेचे चित्रीकरण चालत असे. श्रीरामाच्या बालरूपासाठी एका बाळाला आणले होते. त्यासमवेत खेळण्यासाठी कावळ्याची आवश्यकता होती. रामानंद सागर यांच्या दृष्टीने ‘वेगळी काही योजना करण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष कावळा आल्यास उत्तम होईल’, असे त्यांना वाटत होते. त्या परिसरात एका झाडावर बसलेला कावळ्याचा त्यांना आवाज आला. त्यांनी त्वरित झाडाजवळ कावळ्याला प्रार्थना केली, ‘चित्रीकरणासाठी कृपया रामरूपातील बालकाजवळ यावे.’ रामानंद सागर यांनी ही प्रार्थना केल्याक्षणी झाडावरील कावळा त्वरित रामरूपातील बाळाजवळ आला. कावळा जवळ आल्यावर रामरूपातील बाळ त्याच्याशी खेळू लागले, त्याला थोपटू लागले, बाळाला दिलेला खाऊ बाळ कावळ्याला देऊ लागले. बाळ कावळ्याला हटकत असूनही कावळा उडून पुन्हा बाळाजवळ बसत असे. असे साधारण १० मिनिटे चालू होते. या सर्व प्रसंगाचे चित्रीकरण करण्यास रामानंद सागर यांनी त्यांच्या छायाचित्रकाराला सांगितले होते आणि त्याप्रमाणे त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले. ही एक मोठी अनुभूती उपस्थित सर्व कलाकार आणि चित्रीकरणाच्या चमूला आली.

२. कै. रामानंद सागर यांना मिळालेला आशीर्वाद

रामानंद सागर त्यांच्या तारुण्यात एकदा क्षयरोगाने आजारी होते. तेव्हा क्षयरोगावर उपचार करणारी औषधे नव्हती. क्षयाच्या रुग्णांना एका मोठ्या सर्व क्षयरोगी असणार्‍या वेगळ्या रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येत असे. या ठिकाणी क्षयबाधित लोक भरती होत असत; मात्र जिवंत घरी परतत नसत. याच ठिकाणी एक दिवस एक साधू आले आणि त्यांनी आजारी रामानंद सागर यांना सांगितले, ‘तुम्हाला काही होणार नाही. तुमच्याकडून रामायणाशी संबंधित कथेची निर्मिती होईल.’ त्याप्रमाणे खरोखरच रामानंद सागर हे बरे झाले आणि त्यांनी ‘रामायण’ या महामालिकेची निर्मिती करून ते घराघरात पोचवले. त्यांना ‘आधुनिक तुलसीदास’ असे म्हटले जाते.

३. रामायणाच्या पात्रांप्रतीचा लोकांचा भाव

रामायण मालिकेत अभिनेते श्री. अरुण गोविल यांनी श्रीरामाची, तर अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका केली होती. श्री. गोविल आणि दीपिका चिखलिया हे जेथे जातील, तेथे लोक त्यांच्या पाया पडायचे, त्यांना नमस्कार करायचे. लोक त्यांना राम आणि सीता म्हणूनच पहायचे. श्री. गोविल यांची श्रीरामाची भूमिका लोकांना आणि मालिका-चित्रपट यांची निर्मिती करणार्‍यांना एवढी आवडली होती की, त्यामुळे त्यांना वेगळ्या भूमिका मिळेनाशा झाल्या. त्यांना ‘श्रीराम’ म्हणून पहाणेच लोकांना आवडत होते.

४. रावणाची भूमिका करणार्‍या कलाकाराने क्षमा मागणे

रामायण मालिकेत रावणाची भूमिका अरविंद त्रिवेदी यांनी केली होती. त्यांनी रावणाची केवळ भूमिकाच न करता ती व्यक्तीरेखा जिवंत केली. कोरोना महामारीच्या काळात पुन्हा एकदा दूरचित्रवाणीवर रामायण मालिका लावण्यात आली. त्या वेळी सीताहरणाचा प्रसंग दूरचित्रवाणीवर पहातांना वृद्ध झालेले अरविंद त्रिवेदी यांनी कान पकडून क्षमा मागितली होती. हा चांगल्या संस्कारांचा प्रभाव आहे. मालिका पहातांना क्षमा मागणार्‍या त्रिवेदी यांचा व्हिडिओ अधिक प्रमाणात प्रसारित झाला होता.

५. रामायण मालिकेचा प्रभाव

रामायणासारखी भव्य दिव्य मालिका १९८० च्या दशकात प्रसारित झाली. रामायण मालिका चालू झाली, तेव्हा तिचे भाग पहाण्यासाठी बस, रेल्वे थांबायच्या आणि प्रवासी उतरून रस्त्यालगत मिळेल तिथे टीव्हीजवळ जाऊन मालिका पहायचे. प्रत्येक ठिकाणी शेकडोंच्या संख्येने गर्दी असायची. मालिका चालू झाल्याजवळ भारतातील जवळपास सर्वच रस्ते, गल्ल्या येथे शुकशुकाट असायचा. व्यापारीही दुकाने बंद ठेवायचे. काही लोक अंघोळ करून दूरचित्रवाणीच्या संचाची पूजा करून, संचाला हार घालून नंतर भक्तीभावाने पूर्ण कुटुंब मालिका पहात असत.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१७.१.२०२४)