पुनश्च प्रभु श्रीराम !

श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग ५)

प्रभु श्रीरामचंद्र

श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्‍यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच; पण आजतागायत सहस्रो वर्षांनंतरही त्या अवतारत्वाची प्रचीती आपण सर्व जण घेत आहोत !…आणि आताच्या घडीला ती अधिकच प्रकर्षाने जाणवत आहे…! ईश्वर जेव्हा विशिष्ट कार्याच्या पूर्तीसाठी मनुष्य अथवा प्राण्याचे शरीर धारण करून भूलोकी येतो, तेव्हाच त्याला ‘अवतार’ म्हणतात. भूलोकी धर्माची हानी झाली की, लोक पुरुषार्थहीन होऊन त्यांची वृत्ती अधर्माकडे वळते. सृष्टीत उपद्रव चालू होतात आणि विनाशाची प्रक्रिया वाढू लागते. तो विनाश थांबवून धर्माची घडी पुन्हा नीट बसवणे आणि मानवाला धर्ममार्गावर आरूढ करणे, याकरता युगायुगातून भगवंत अवतार घेतो. श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पुन्हा जणू प्रभु श्रीरामाचे तत्त्वच पृथ्वीवर अवतरत आहे…! प्रभु श्रीराम यांची आठवण आली की, रामराज्य आठवते. प्रभु श्रीराम यांच्या काळी रामराज्य होते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती सत्त्वगुणी होती. कुणी कुणावर अन्याय, अत्याचार करत नव्हते. सर्वत्र ‘सुजलाम् सुफलाम्’ होते. जनतेची आनंदावस्था उच्च कोटीची होती. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना ‘असे वातावरण पृथ्वीवर पुन्हा एकदा अनुभवायला मिळावे’, असे वाटून सध्याच्या सोहळ्यामध्ये सर्वजण एक मनाने सहभागी होत आहेत ! यासाठी प्रत्येकाचा उत्साह आणि प्रेरणा अवर्णनीय आहे. कुणाला काही सांगावे लागत नाही. ‘हा सोहळा माझाच आहे’, असे वाटून मनातील दुष्टता बाजूला ठेवून ‘प्रभु श्रीरामांचे स्वागत कसे चांगले होईल’, असाच विचार प्रत्येकाच्या मनात आहे !

प्रभु श्रीरामांनी त्यांच्या आचरणातून ‘राजाने कसे वागावे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर घालून दिला आहे. ‘राजाचे वागणे योग्य असेल, तर प्रजेलाही योग्यच वागावे लागते’, हे रामराज्यात पहायला मिळाले होते. श्रीरामांनी धर्माच्या सर्व मर्यादा पाळून समाजाला आदर्श घालून दिला; म्हणून ते ‘मर्यादापुरुषोत्तम’ होते ! आताही श्रीराममंदिर उभारणीतील अडथळे दूर होऊन सर्वांना पुन्हा एकदा प्रभु श्रीरामांना अनुभवायला मिळत आहे. यानिमित्ताने ‘पुन्हा एकदा रामराज्य येईल’, असे हिंदूंना वाटत आहे.

२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे सर्वांना वाटणारा उत्साह हा शब्दांत वर्णन करता न येण्यासारखा आहे, प्रत्येक जणच हा आनंद अनुभवत २२ जानेवारीची वाट पहात आहे. येथे प्रभु श्रीरामचंद्रांची आठवण म्हणजेच त्यांच्या गुणांची आठवण सर्वांनी ठेवूया. त्रेतायुगात प्रत्यक्ष प्रभु श्रीराम असतांना त्यांच्या सहवासात सर्वांना जेवढ्या प्रमाणात आनंद, उत्साह आणि चैतन्य अनुभवायला मिळाले होते, तेवढ्याच प्रमाणात आताही श्रीरामभक्त अनुभवत आहेत. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील प्रभु श्रीरामांचे अस्तित्व सूक्ष्म रूपाने अनुभवत आहेत. रावणाने श्रीरामांचे शत्रुत्व पत्करले. एक प्रकारे तो विरोधीभक्ती करून श्रीरामांच्या अनुसंधानात होता. शेवटी श्रीरामांकडूनच वध झाल्याने त्याला मोक्ष मिळाला. सध्याच्या काळातही श्रीरामांना न मानणार्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांनाही ‘रामा’विना पर्याय नाही ! त्यांच्यापैकी काहींना ते कळल्यामुळेही ते या सोहळ्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन श्रीरामांशी जोडले जाऊ पहात आहेत. त्यामुळेच जे प्रभु श्रीरामांचे अस्तित्व मानत नव्हते, त्यांनाही या सोहळ्यासाठी जावेसे वाटत आहे, हीसुद्धा प्रभु श्रीरामचंद्रांचीच लीला !

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांच्या विचारांचे मंथन होत आहे. यातूनच प्रभु श्रीरामचंद्रच आताही एक प्रकारे दुष्प्रवृत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. रामराज्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकानेच आता साक्षात् ‘प्रभु श्रीरामचंद्रांचे तत्त्व पृथ्वीवर अवतरत आहे’, हा भाव ठेवून आपल्यातील रज-तम, म्हणजेच स्वार्थी वृत्ती, राग, लोभ, द्वेष, मत्सर नष्ट करून ‘संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे’, या विचाराच्या दिशेने जाऊया; किंबहुना प्रभु श्रीरामच या दिशेने सर्वांना घेऊन जातील !

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.