उद्या, पौष शुक्ल एकादशी (२१.१.२०२४) या दिवशी श्री. निरंजन चोडणकर यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. निरंजन चोडणकर यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. आध्यात्मिक मित्र
‘निरंजनदादा माझा चांगला आध्यात्मिक मित्र आहे. वर्ष २०१३ पासून आमची आध्यात्मिक मैत्री आहे.
२. साधनेची तळमळ
मी त्यांना भ्रमणभाष केल्यावर ते मला ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी कोणती मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत ?’, असे विचारतात.
३. कार्यकर्त्यांना आधार देणे
अ. ते नेहमी हसतमुखाने कार्यकर्त्यांशी बोलतात. ते ‘कार्यकर्त्यांना साधनेत कोणती अडचण आहे ?’, याविषयी नीट समजून घेतात. ‘कार्यकर्त्याला उत्साह वाटावा आणि त्याने सकारात्मक राहून प्रयत्न करावेत’, अशा पद्धतीने ते त्याला उपाययोजना सांगतात.
आ. काही प्रसंग घडल्यास मी दादांशी मनमोकळेपणाने बोलतो. ते मला प्रसंगात ‘कोणता दृष्टीकोन ठेवायला हवा’, याविषयी अत्यंत प्रेमाने सांगतात. काही कारणांमुळे मला निराशा आली, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी ते मला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात.
४. गुरुकार्याचा ध्यास
४ अ. शारीरिक त्रास होत असतांनाही सेवारत असणे : निरंजनदादाला शारीरिक त्रास होत असतात; मात्र ते शारीरिक त्रासांकडे लक्ष न देता गुरुसेवा करण्याकडे लक्ष केंद्रित करतात. त्यांची शारीरिक स्थिती ठीक नसली, तरीही ते गुरुसेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.
४ आ. गुरुदेवांना अपेक्षित असे शिबिर होण्यासाठी प्रयत्नरत असणे : दादा युवा कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी शिबिरे घेतात. ‘शिबिरार्थींना चांगले मार्गदर्शन कसे मिळेल ? त्यांना प्रोत्साहन कसे मिळेल ?’, या दृष्टीने दादांची विचारप्रक्रिया असते. गुरुदेवांना अपेक्षित असे शिबिर होण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात.
५. मायेतून अलिप्त
अ. दादा घरी गेले, तरीही ते तेथे अधिक वेळ रहात नाहीत. त्यांच्या मनात ‘सेवेत रहायचे’, हाच विचार अधिक प्रमाणात असतो.
आ. दादांना मायेविषयी आसक्ती नाही. ते प्रत्येक विचार गुरुदेवांशी जोडतात. त्यांचा ‘मला केवळ गुरुचरणी रहायचे आहे. ईश्वरप्राप्ती करायची आहे’, हा विचार दृढ असतो.
६. भाव
कितीही कठीण प्रसंग असो निरंजनदादा भावाच्या स्तरावर प्रयत्न करून त्या प्रसंगातून बाहेर पडतात. एकदा अकस्मात् दादांच्या पोटात दुखत होते आणि त्यांना ताप यायला आरंभ झाला होता. तेव्हा दादांनी ‘नाभीमध्ये भगवान श्रीविष्णूचे स्थान आहे. ते मला अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवला. त्यांनी भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्याने ते दोनच दिवसांत ठीक झाले.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला निरंजनदादांसारखा आध्यात्मिक मित्र मिळाला. ‘प्रत्येक कृतीला भावाची जोड देणे’, हे मला दादांकडून शिकायला मिळाले, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
‘निरंजनदादांसारखे गुण माझ्यामध्ये यावेत’, अशी मी गुरुदेवांच्या पावन श्रीचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४४ वर्षे), देहली (२१.१२.२०२३)
युवा पिढीला साधनेचे महत्त्व सांगून साधनेत पुढे नेण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे श्री. निरंजन चोडणकर !
१. नम्रता
‘निरंजनदादांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांची विनयशीलता, नम्रता आणि साधकत्व दिसून येते. ‘लहान-मोठे’, असे न पहाता ते सर्वांशी आदराने बोलतात.
२. तरुणांना साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नरत असणे
‘एक युवा संघटक, म्हणजे नेमके कसे असावे ?’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे निरंजनदादा ! आजच्या तरुण पिढीला साधनेकडे वळवण्याचे दायित्व घेऊन त्यांना साधनेत पुढे नेण्याचा ध्यास दादांना लागलेला असतो.
३. इतरांना साधनेत साहाय्य करणे
अ. मी दादांना माझ्या मनाची नकारात्मक स्थिती सांगते. तेव्हा ते मला प्रसंगात न अडकता त्यातून शिकून पुढे जाण्यास सांगतात. त्यांनी मला त्यांच्या संदर्भात घडलेले काही प्रसंगही सांगितले. ‘गंभीर प्रसंगांत न डगमगता शिकण्याच्या स्थितीत आणि सकारात्मक कसे रहायला हवे ?’, हे मला त्यांतून शिकता आले.
आ. जेव्हा मी दादांना माझ्या साधनेतील काही अडचणी सांगितल्या, तेव्हा त्यांनी मला त्यांमागील आध्यात्मिक दृष्टीकोन सांगितले. ‘कोणत्या गोष्टी प्रारब्धामुळे घडतात ? दैवी नियोजन कसे असते ? आपले गुण, स्वभावदोष आणि अहं यांचा प्रसंगांवर कसा परिणाम होतो ?’ इत्यादी बारकावे त्यांनी मला सांगितले.
इ. मी त्यांना कधीच भावनाशील झालेले पाहिले नाही. ‘जे अयोग्य आहे, ते चुकलेलेच आहे’, हे सांगून ते समोरच्याला अंतर्मुख होण्यासाठी तत्त्वनिष्ठतेने साहाय्य करतात. ‘रडायचे नाही, तर लढायचे !’, असे म्हणून ते स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी मला नेहमी प्रोत्साहन देतात. ‘सक्षम आणि स्वावलंबी कसे बनायचे ?’, हे ते मला सांगतात.
४. ते नेहमी लहान लहान गोष्टींतील आनंद घेतात, तसेच इतरांच्या आनंदात सहभागी होतात.
५. त्यांच्या बोलण्यातून ‘ते सतत शरणागतभावात असतात’, असे जाणवते.
६. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे
एकदा मी त्यांचे कौतुक केले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘जे काही घडते, ते माझे प.पू. डॉक्टर करतात. मी निमित्तमात्र आहे.’’
‘दादांमधील अनेक गुण मला शिकता येऊ दे आणि त्यांना लवकरात लवकर संत झालेले आम्हाला पहाता येऊ दे’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते.’
– कु. अवनी छत्रे, नागेशी, गोवा. (३१.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |