Narendra Modi Permanent Houses:देशातील ४ कोटी लोकांना आम्ही पक्की घरे देऊ शकलो ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

कामगारांसाठी बांधलेल्या देशातील सर्वांत मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण !

नरेंद्र मोदी

सोलापूर – देशातील ४ कोटी लोकांना आम्ही पक्की घरे देऊ शकलो. या लोकांना किती आनंद झाला, ते त्यांनाच विचारा. देशात दीर्घकाळापर्यंत ‘गरिबी हटवा’च्या घोषणा देण्यात आल्या; पण गरिबी गेली नाही; कारण गरिबांच्या नावावर योजना होत होत्या. प्रत्यक्षात त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नव्हता. याचा अर्थ आधी सरकारची नीती, निष्ठा आरोपीच्या पिंजर्‍यात होती; परंतु आता तुम्ही बघितलेले दिवस तुमच्या मुलांना बघायला मिळणार नाहीत. झोपडीऐवजी आता पक्क्या घरात तुम्हाला रहाण्यास मिळणार आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारी या दिवशी येथे केले. येथे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. सोलापूर येथे असंघटित आणि विडी कामगार यांसाठी ३५० एकर परिसर, ८३४ इमारती, ३० सहस्र सदनिका अशी देशातील सर्वांत मोठी कामगार वसाहत बांधण्यात आली आहे. या वसाहतीच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. येथे ‘अमृत २.०’ योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. तसेच ‘स्वनिधी’ योजनेतील काही लाभार्थ्यांना निधीही सोपवण्यात आला.

पंतप्रधान म्हणाले,…

१. संतांच्या मार्गदर्शनाखाली मी यम-नियमांचे कठोर पालन करत आहे. तुमच्या आशीर्वादाने ११ दिवसांचे हे व्रत मी करणार आहे. माझ्या अनुष्ठानाचा प्रारंभ महाराष्ट्राच्या नाशिक येथील पंचवटी येथून झाला आहे.

२. दीर्घ प्रतीक्षेनंतर आपले श्रीराममंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २२ जानेवारीला संध्याकाळी सर्वांनी घराघरात रामज्योत लावावी.

३. देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. आम्ही फक्त देशातील गरिबांना साधन-सुविधा दिल्या. त्यांनी स्वत: गरिबीतून वर येण्यासाठी प्रयत्न केले.

सौजन्य :आज तक

पंतप्रधान भावुक झाले !

महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील जनता यांच्या परिश्रमामुळे होत आहे. देशातील सर्वांत मोठ्या सोसायटीचे लोकार्पण झाले. मलापण लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवे होते, असे म्हणत पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाले आणि ते भावुक झाले. मोदींनी क्षणभर भाषण थांबवले. ‘तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज १ लाखांपेक्षा अधिक परिवाराचा गृहप्रवेश होईल’, असे ते या वेळी म्हणाले.