अयाध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्कंठा शिगेला !

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

प्राणप्रतिष्ठा सोहळा सिद्धता अंतिम टप्प्यात

अयोध्या, १८ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जसजसा दिवस जवळ येत आहे, तसतशी श्रीरामभक्तांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. सोहळ्याला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असल्याने या सोहळ्यापूर्वीच श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशांतून भाविक अयोध्येत येत आहेत. विशेषतः श्री रामललाच्या दर्शनासाठी नेपाळहून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. येणारे सर्व भाविक ‘आपल्याला नवे श्रीराममंदिर पहायला मिळेल’, या आशेने येत आहेत; मात्र सध्या भाविकांना श्रीरामजन्मभूमीवर पूर्वीप्रमाणेच तात्पुरत्या उभारलेल्या मंदिरात श्री रामललाचे दर्शन घेता येत आहे. नवे श्रीराममंदिर २२ जानेवारीनंतरच भाविकांना पहायला मिळत आहे.

भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे. दर्शनरांगेत उभे असलेले भाविक उर्त्स्फूतपणे ‘जय श्रीराम’चा क्षात्रतेजयुक्त जयघोष करत आहेत, तर काही जण भावपूर्णपणे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप सामूहिकपणे करत दर्शन घेत आहेत.

प्रशासकीय सिद्धता अंतिम टप्प्यात !

एकूणच अयोध्यानगरी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची प्रशासकीय सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. सहस्रो कामगार लगबगीने त्यांच्या कामावर अंतिम हात फिरवतांना दिसत आहेत.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त !

संपूर्ण अयोध्यानगरीत पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सशस्त्र पोलीस, तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.