हिंदूंची अडवणूक आणि धर्मांधांचे लांगूलचालन करणारे दुटप्पी पोलीस !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. प्रभु श्रीराम प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने काढलेल्या शोभायात्रेच्या संयोजकांवर फौजदारी गुन्हे नोंद

‘प्रभु श्रीराम प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने भाग्यनगर येथे श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्ट’ने शोभायात्रा काढण्यासाठी पोलिसांची अनुमती मागितली. नेहमीप्रमाणे हिंदूंच्या नशिबी येथेही अवहेलनाच आली. २९.१२.२०२३ या दिवशी ही मिरवणूक शांततेत निघाली. असे असतांनाही ‘ध्वनीक्षेपकाचा आवाज कर्णकर्कश होता, रहदारीला अडथळा निर्माण केला आणि घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाले’, अशी कारणे देत येथील मार्केट पोलीस ठाण्यात ‘श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्ट’चे संयोजक इत्यादींवर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले. त्यात प्रामुख्याने अवैधपणे रस्ता अडवणे, उपद्रवकारक कृती करणे, पोलिसांनी ठरवून दिलेल्या अटींचे उल्लंघन करणे असे गुन्हे होते. पोलिसांनी लावलेले अन्यायकारक गुन्हे रहित करण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी क्षेत्र ट्रस्ट’ने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. शोभायात्रा शांततेत पार पाडली होती, तसेच पोलिसांची विनाकारण गुन्हे नोंदवण्याची कृती लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी संयोजकांविरुद्धचे फौजदारी गुन्हे रहित केले.

२. हिंदूंवरील अन्याय थांबवण्यासाठी धर्मसंघटन करणे आवश्यक ! :

यातून एक गोष्ट लक्षात येते की, जेथेही धर्मांधांचे लांगूलचालन करणारे शासनकर्ते असतात, तेथे हिंदूंची अडवणूक केली जाते. धर्मांध त्यांच्या मिरवणुकांमध्ये धुडगूस घालतात. शस्त्रांचे प्रदर्शन करतात, पोलिसांवर आक्रमणे करतात. ते प्रशासनाकडे अनुमती मागत नाहीत किंवा नाकारलेल्या अनुमतीला किंमतही देत नाहीत. अशा वेळी पोलिसांकडून मर्दुमकी दाखवली जात नाही. यातून हिंदूंनी प्रखर धर्मसंघटन करावे आणि लाचार शासनकर्त्यांना लोकशाही मार्गाने निवडणुकीत घरी बसवावे, म्हणजे त्यांना हिंदूंच्या मताची किंमत कळेल. ‘हिंदूंच्या भावनांची किंमत समजून घेऊन शासनकर्ते, पोलीस आणि प्रशासन हिंदूंना योग्य तो न्याय देतील’, अशी आशा करूया.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१४.१.२०२४)