साधनेची आवड नसतांनाही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !

‘अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या या लेखमालेचा सर्वांत अधिक लाभ मलाच झाला आहे. त्याचे कारण हे की त्यांनी लिहिलेले माझ्या जीवनातील अनेक वर्षांतील अनेक प्रसंग मला आठवत नव्हते, ते या लेखमालेमुळे मला आठवले. त्यामुळे आता माझे जीवनचरित्र लिहिण्याची तळमळ असलेले साधक मला जेव्हा जीवनातील प्रसंग विचारतात, तेव्हा मला या लेखमालेमुळे अनेक प्रसंग सांगता येतील.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१०.२०२२)    

१६. १.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण, ‘अधिवक्ता रामदास केसरकर यांनी निवृत्त जीवन जगण्याचा निश्चय केल्यावर वेळ जाण्यासाठी संमोहनशास्त्र शिकायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुण अनुभवता आल्यामुळे ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आकर्षित झाले’, ही सूत्रे पाहिली. आजच्या भागात आपण अधिवक्ता केसरकर साधना करत नसतांनाही त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत केलेला प्रचारदौरा आणि तेव्हा त्यांना जाणवलेली सूत्रे पहाणार आहोत.   

(भाग २) 

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/755443.html

अधिवक्ता रामदास केसरकर

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विधानाची अनुभवलेली सत्यता !

‘पहिल्या अभ्यासवर्गाच्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ घेतला होता. तो वाचल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘यात लिहिलेले शास्त्र खरे असेल, तर ते संमोहनशास्त्रापेक्षा फारच प्रगत आहे; परंतु या शास्त्राची सत्यता कशी पडताळायची ? किंवा ते सत्य कशावरून ?’; म्हणून मी ठरवले, ‘पुढच्या वर्गाला आपल्यापैकी २० – २५ जिज्ञासू उपस्थित रहातील’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या पहिल्या अभ्यासवर्गात केलेल्या विधानाची निश्चिती करूया. त्यासाठी त्यांच्या पुढच्या मासात होणार्‍या अभ्यासवर्गाला उपस्थित राहूया.’ त्याप्रमाणे मी त्यांच्या पुढील अभ्यासवर्गाला उपस्थित राहिलो. अभ्यासवर्ग त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेत होता. पहातो, तर काय आश्चर्य ! त्या वर्गात केवळ २३ जिज्ञासू उपस्थित होते. त्यामुळे मला आश्चर्य वाटलेच; पण माझ्या मनात त्यांच्याविषयी आणखी कुतूहल निर्माण झाले.

५. साधना चालू केलेली नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत केलेला पहिला प्रचारदौरा !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या समवेत गोव्याला येण्याविषयी विचारल्यावर त्वरित होकार देणे : त्यानंतर (६.२.१९९४ या दिवशी) मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दूरभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘मी उद्या गोव्याला जाणार आहे. तुम्ही माझ्या समवेत येता का ?’’ तेव्हा ‘माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेले कुतूहल शमेल’, या विचारांनी मी होकार दिला. दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजता निघायचे असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला रात्री त्यांच्या घरी रहायला बोलावले. त्याप्रमाणे मी रात्री मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी गेलो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर साधक श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) आणि श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्यासह समवेत न्यायच्या साहित्याची बांधाबांध करत होते. आम्हाला पहाटे निघायचे असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला लवकर झोपून सकाळी लवकर उठून आवरण्यास सांगितले.

५ आ. सावंतवाडी येथील अभ्यासवर्ग

५ आ १. सावंतवाडी येथील डॉ. पेंढारकर यांच्या घरी मुक्काम आणि तेथील साधकांच्या भेटी : दुसर्‍या दिवशी (७.२.१९९४ या दिवशी) ठरल्याप्रमाणे आमचा मुंबई येथून निघून गोव्याला जाण्यासाठीचा प्रवास चालू झाला. नागोठणे (जिल्हा रायगड) येथे स्थानिक साधकांनी आमच्यासाठी अल्पाहार आणला होता. परात्पर गुरु डॉक्टर तेथील साधकांशी १० मिनिटे बोलले. तेवढ्या वेळेत गाडीत बसूनच सगळ्यांनी अल्पाहार घेतला आणि पुन्हा पुढचा प्रवास चालू झाला.

सायंकाळी ७.१५ वाजता आम्ही सावंतवाडीला डॉ. पेंढारकर यांच्या घरी पोचलो आणि रात्री त्यांच्या घरी मुक्काम केला. तिथे परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच साधक आले होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत परात्पर गुरु डॉक्टरांनी दुसर्‍या दिवशी सावंतवाडी येथील नियोजित अभ्यासवर्गाच्या संदर्भात काही साधकांशी चर्चा केली.

५ आ २. सावंतवाडी येथील परात्पर गुरु डॉक्टरांच्या अभ्यासवर्गात केवळ बघ्याची भूमिका घेणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ठाणे येथील अभ्यासवर्गाप्रमाणेच सावंतवाडी येथेही सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत अभ्यासवर्ग घेतला. हा अभ्यासवर्ग सावंतवाडी येथील ‘स्टेट बँके’च्या वर असलेल्या एका सभागृहात होता. तेथे माझी केवळ बघ्याची भूमिका होती. त्या वर्गात अध्यात्मशास्त्राचा काही भाग शिकवून झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासू आणि साधक यांना ‘काही विशेष अनुभूती आल्या असतील, तर त्या सांगा’, असे सांगितले. त्याप्रमाणे काहींनी त्यांच्या अनुभूती सांगितल्या. त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘केसरकर, तुम्हाला काही अनुभूती आली असेल, तर सांगा.’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘मला या विषयातील काही कळत नाही. मी साधनाही करत नाही. त्यामुळे मला काही सांगायचे नाही.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मग तुमचे नाव तरी सांगा.’’ तेव्हा माझे नाव सांगून ‘मी ठाण्यात वकिली व्यवसाय करतो’, एवढेच सांगितले.

५ इ. देवगड येथील अभ्यासवर्ग

५ इ १. प्रा. (सौ.) तरुजा भोसले यांच्याकडे निवासाला गेल्यावर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येणे आणि ‘श्री गुरूंना पाहिल्यावर भावजागृती होऊन डोळ्यांतून अश्रू येतात’, हे पुढे साधनेत आल्यानंतर काही वर्षांनी कळणे : सावंतवाडी येथील अभ्यासवर्ग झाल्यानंतर लगेचच सायंकाळी ६ वाजता आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे जाण्यासाठी निघालो. त्या दिवशी रात्रीचा मुक्काम देवगड येथील प्रा. (सौ.) तरुजा भोसले यांच्या निवासस्थानी होता. त्यांच्या घरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच साधक दुसर्‍या दिवशी देवगड येथे होणार्‍या अभ्यासवर्गाची सिद्धता करण्यासाठी आले होते. सगळ्यांचे रात्रीचे जेवण झाले. त्या ठिकाणीही मी पाहुण्यासारखा केवळ पहात होतो. त्या घरी मला एक स्त्री रडतांना दिसली. मला प्रश्न पडला, ‘सगळी साधकमंडळी अगदी आनंदात आहेत आणि ही स्त्री का रडत आहे ?’ ती रडणारी स्त्री, म्हणजे त्या घराच्या मालकीण प्रा. (सौ.) तरुजा भोसले होत्या. ‘त्यांचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या घरी आल्याने त्यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते’, हे मला मी साधना चालू केल्यानंतर बर्‍याच कालावधीनंतर कळले. दुसर्‍या दिवशी (९.२.१९९४ या दिवशी) सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत देवगड येथील गोगटे कनिष्ठ महाविद्यालयात परात्पर गुरु डॉक्टरांचा नेहमीप्रमाणे अभ्यासवर्ग झाला.

– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे), (सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)

(क्रमशः)