साधनेची आवड नसतांनाही केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !

अधिवक्ता रामदास केसरकर यांना पूर्वी साधनेची आवड नव्हती. त्यांनी नोकरी आणि व्यवसाय यांतून पुष्कळ धन मिळवले; मात्र त्यांच्या मनाला शांती अन् समाधान मिळत नव्हते. ‘ते मिळवण्यासाठी नेमके काय करायला हवे ?’, हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यासाठी ‘नोकरी आणि व्यवसाय बंद करून दूर समुद्राकाठी निवांत आयुष्य व्यतीत करावे’, असे त्यांना वाटले; पण ‘नोकरी आणि व्यवसाय बंद केल्यावर वेळ कसा घालवायचा ?’, असा प्रश्नही त्यांच्या मनात होता. एकदा त्यांनी करमणूक म्हणून ‘संमोहनशास्त्रा’चा एक प्रयोग पाहिला. त्यांना तो आवडला. त्यांना वाटले, ‘संमोहनशास्त्र शिकल्यास वेळ जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल.’ संमोहनशास्त्र शिकण्यासाठी त्यांनी संमोहनतज्ञ असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घ्यायचे ठरवले. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गाला ते उपस्थित राहिले आणि त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. अधिवक्ता केसरकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात त्यांचे समर्पक बोलणे आणि वागणे, साधेपणा, शिकवण्याची आगळी-वेगळी शैली, नम्रता, अहंशून्यता, तत्परता, अशा अनेक अद्वितीय गुणांची जाणीव होत गेली आणि ते त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली आणि वर्ष २०२१ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. याविषयी पुढे दिले आहे.         

(भाग १)

‘अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या या लेखमालेचा सर्वात अधिक लाभ मलाच झाला आहे. त्याचे कारण हे की त्यांनी लिहिलेले माझ्या जीवनातील अनेक वर्षांतील अनेक प्रसंग मला आठवत नव्हते, ते या लेखमालेमुळे मला आठवले. त्यामुळे आता माझे जीवनचरित्र लिहिण्याची तळमळ असलेले साधक मला जेव्हा जीवनातील प्रसंग विचारतात, तेव्हा मला या लेखमालेमुळे अनेक प्रसंग सांगता येतील.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.१०.२०२२) 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ठाण्यातील पहिला अभ्यासवर्ग संपल्यानंतर त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या आणि त्या अभ्यासवर्गाला उपस्थित असलेल्यांपैकी श्री. शिवाजी वटकर (आताचे पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे समष्टी संत, वय ७६ वर्षे)) यांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘आजच्या आपल्या ठाण्याच्या अभ्यासवर्गाचे काम झाले. आपल्याला ठाण्यात एक वकील मिळाले. ते पुढे सनातनचा न्यायालयीन लढा लढतील.’’ पुढे झालेही तसेच ! खरेतर त्या अभ्यासवर्गानंतर मी लगेचच घरी निघून गेलो होतो. मला साधनेत काहीच रुची नव्हती, तरी त्यांच्या द्रष्टेपणामुळे त्यांनी माझ्या संदर्भात तसे विधान केले होते. हे मला मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यानंतर काही वर्षांनंतर कळले !’

– अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)

अधिवक्ता रामदास केसरकर

१. समाधानाच्या शोधात !

१ अ. ‘व्यवसाय आणि नोकरी करून भौतिक साधने प्राप्त केल्याने भौतिक सुख मिळाले; मात्र आत्मसुख मिळाले नाही’, याची जाणीव होणे : ‘वर्ष १९७७ पासून वर्ष १९९७ पर्यंत मी ठाणे येथे वकिली व्यवसाय केला. त्याच कालावधीत केवळ आवड म्हणून मी विधी (कायदा) विषयाचा प्राध्यापक म्हणून ठाणे येथील विधी महाविद्यालयात नोकरीही केली. त्यामुळे मला बरीच अर्थप्राप्ती झाली. त्यातून मी आवश्यक ती भौतिक साधने प्राप्त केली; परंतु वर्ष १९९३ मध्ये प्रथमच मला आतून जाणवले, ‘मी भौतिक सुख मिळवले असले, तरी मला आत्मसुख (आत्मसमाधान) मिळाले नाही. त्यासाठी ‘वकिली व्यवसाय बंद करून आणि विधी महाविद्यालयातील नोकरीचे त्यागपत्र देऊन मुंबईपासून दूर कुठेतरी जाऊन समुद्राच्या सान्निध्यात वास्तव्य करून निवृत्त जीवन जगल्यास आत्मसुख मिळेल’, असे मला वाटले.

१ आ. ‘मुंबईपासून दूर समद्राकाठी राहून निवृत्त आणि शांत जीवन जगायचे’, असे निश्चित करणे आणि त्याला पत्नीनेही आनंदाने सहमती दर्शवणे : मे १९९४ मध्ये मी ‘वकिली व्यवसाय बंद करून आणि विधी विद्यालयातील नोकरीचे त्यागपत्र देऊन गोवा किंवा रत्नागिरी येथे समुद्रकिनार्‍याजवळ लहानसे घर बांधून निवृत्त जीवन जगायचे’, असे निश्चित केले. तेव्हा माझे वय ४२ वर्षे होते. माझी पत्नी सौ. प्रमिला (आताच्या पू. (कै.) सौ. प्रमिला केसरकर (सनातनच्या १२१ व्या संत)) या ठाणे येथील मुख्य डाकघरात नोकरी करत होत्या. मी त्यांना हा प्रस्ताव सांगितला. त्यांनी कुठलीही अडचण न सांगता त्यांच्या नोकरीचे त्यागपत्र देण्याची सिद्धता दर्शवून माझ्या प्रस्तावाला मनापासून सहमती दिली.

१ इ. ‘व्यवसाय बंद केल्यावर ‘संमोहनशास्त्र’ शिकल्यास वेळ घालवता येईल’, असे वाटणे : घरासाठी भूखंड घेण्यासाठी मी रत्नागिरीमध्ये माझे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी एका रविवारी मी रत्नागिरीला गेलो असतांना तेथील जोगळेकर महाविद्यालयात मुंबईचे प्रा. मनोहर नाईक यांचा ‘संमोहन विद्ये’चा (हिप्नॉटिझमचा) प्रयोग करमणूक म्हणून पाहिला. तो प्रयोग पाहिल्यानंतर मला ‘संमोहन विद्या’ हे एक शास्त्र असून त्यात वेगळेपण आहे’, असे जाणवले. ‘ते शिकल्यास वेळ घालवण्याचे ते एक चांगले साधन ठरेल’, अशा निष्कर्षाप्रत मी आलो. ‘ते शास्त्र कुणाकडे शिकावे ?’, या शोधात असतांना मला ‘डॉ. जयंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) संमोहन तज्ञ असून ते संमोहनशास्त्र शिकवतात’, असे कळले.

 २. जीवनाला कलाटणी देणारी  परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट !

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गाला उपस्थित रहाणे आणि वर्गातील सुशिक्षित लोक पाहून ‘येथे काय शिकवतात ?’, अशी जिज्ञासा जागृत होऊन अभ्यासवर्ग पूर्ण होईपर्यंत थांबणे : त्याच सुमारास रविवारच्या ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘डॉ. जयंत आठवले येत्या रविवारी ठाण्याला अध्यात्मशास्त्राचा अभ्यासवर्ग घेण्यासाठी येणार आहेत’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे मला आणखी आनंद झाला. त्यांच्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५, अशी  होती. त्या रविवारी सकाळी ९.५० वाजता मी ठाणे येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये होणार्‍या त्यांच्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गाला गेलो. त्या शाळेच्या वर्गात ८० लोकांची बसण्याची व्यवस्था होती; परंतु उपस्थिती वाढत जाऊन ती १०० च्यावर गेल्याने काही जण वर्गाच्या दोन्ही दारांजवळ उभे राहिले. उपस्थितांमध्ये माझ्या परिचयाचे ठाणे शहरातील २ वकील आणि २ अभियंतेही मला दिसले. वर्गातील एकूण सगळे चित्र पाहिल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गात काय शिकवतात ?’, हे जाणून घेण्याविषयी माझी जिज्ञासा जागृत झाली. त्यामुळे ज्या हेतूने मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्या संदर्भात त्यांच्याशी कुठलाही संवाद साधण्याचा प्रयत्न न करता मी अध्यात्मशास्त्राचा वर्ग पूर्ण ऐकला.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘साधनेसाठी ईश्वरपाप्तीची तळमळ महत्त्वाची असून साधकांची तळमळ अल्प पडत असल्याने पुढील अभ्यासवर्गात आपल्यापैकी केवळ २० – २५ जणच येतील’, असे सांगणे : त्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेला ‘अध्यात्मशास्त्र’ हा विषय मला समजला नाही; मात्र तरीही माझ्या सवयीनुसार त्यांनी सांगितलेली काही सूत्रे मी लिहून घेतली, उदा. ‘अध्यात्मात प्रगती करण्यासाठी साधकाची तळमळ अतिशय महत्त्वाची असते.’ हे सूत्र शिकवतांना ते म्हणाले, ‘‘साधनेत तळमळीला अतिशय महत्त्व असून साधकांची आध्यात्मिक प्रगती करण्याची तळमळ अल्प असते. त्यामुळे साधकांचे साधनेतील गळतीचे प्रमाण ९९.९९ टक्के असते. आजची उपस्थिती पहा ! आज वर्ग भरलेला आहे; परंतु पुढच्या अभ्यासवर्गाला आपल्यापैकी केवळ २० – २५ जण उपस्थित असतील.’’ त्यांच्या या विधानाचे मला आश्चर्य वाटले. मला प्रश्न पडला, ‘परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या पुढील अभ्यासवर्गातील उपस्थितांच्या संख्येविषयी एवढे ठामपणे कसे काय सांगू शकतात ?’ त्यांच्या या विधानाची निश्चिती करण्यासाठी ‘त्यांच्या पुढच्या अभ्यासवर्गालाही उपस्थित राहूया’, असे मी ठरवले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होणे

‘अध्यात्मशास्त्र’ हा विषय माझ्यासाठी नवीन होता आणि मला त्यात रुची नव्हती. परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेले मला काहीही कळले नव्हते. अध्यात्मशास्त्राच्या सत्यतेविषयी माझ्या मनात शंका होत्या. असे असले, तरी विषय शिकवण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांची काही ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे माझ्या लक्षात आली. त्यामुळे मी त्यांच्याकडे आकृष्ट झालो. त्यांनी अभ्यासवर्गात केलेल्या काही विधानांमुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी कुतूहल जागृत झाले आणि ‘ते नेमके काय करतात ? विनामूल्य अभ्यासवर्ग घेण्यामागे त्यांचा हेतू काय ?’, असे अनेक प्रश्नही माझ्या मनात निर्माण झाले.

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गाविषयी जाणवलेली काही सूत्रे !

३ अ १. शिकवण्याची अलौकिक शैली ! : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची विषय शिकवण्याची पद्धत अलौकिक आहे. मी २० वर्षे शाळा आणि महाविद्यालय येथे शिक्षण घेतले; परंतु अशा पद्धतीने कुठल्याही शिक्षकाने कुठलाही विषय शिकवला नाही. मी स्वतः विधी महाविद्यालयात १७ वर्षे ‘विधी (कायदा)’ हा विषय शिकवत आहे; पण मला त्यांच्याप्रमाणे मुळीच शिकवता येणार नाही.

३ अ २. इंग्लंड येथे अनेक वर्षे व्यवसाय करूनही बोलतांना इंग्रजीचा वापर न करणे : मी त्यांच्याविषयी आधीच काही माहिती मिळवली होती. त्यानुसार ते मुंबई येथे मराठी माध्यमातून शिकले असून मुंबईच्या ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’मधून ‘एम्.बी.बी.एस्.’ झाले आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये ७ वर्षे रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम केले. असे असूनही त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे आणि ते विषय शिकवतांना इंग्रजी भाषेचा मुळीच वापर करत नाहीत.

३ अ ३. विषयाची योग्य निवड आणि शिकवण्याची सोपी पद्धत : अध्यात्मशास्त्र शिकवतांना ते योग्य प्रकारे विषय निवडत असत. ते ‘तात्त्विक आणि प्रायोगिक भाग साधक अन् जिज्ञासू यांच्या सहज लक्षात येईल’, अशा प्रकारे विषयाची मांडणी करून तो अभ्यासवर्गात शिकवत असत.

३ अ ४. ‘विषय साधक आणि जिज्ञासू यांना समजत आहे ना अन् त्यांनी सूत्रे लिहून घेतली आहेत ना ?’, याची निश्चिती करून शिकवणे : ते शिकवत असलेल्या विषयातील महत्त्वाची सूत्रे ते खडूने फलकावर पटापट लिहीत आणि त्या सूत्रांचे सविस्तर विवेचन करत. ‘त्यांनी शिकवलेले सर्वांना कळले ना आणि त्यांनी ते लिहून घेतले ना ?’, याची निश्चिती करून मगच ते फलकावरील लिखाण पुसत. फळा पुसतांनाही ते ‘खडूची धूळ आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पसरू नये’, यासाठी लिखाणाच्या खालच्या बाजूने वरच्या दिशेला आणि वरच्या दिशेने खालच्या बाजूला ‘डस्टर’ने (लाकडाच्या तुकड्याला लावलेल्या कापडाने) अलगद पुसत असत.

३ अ ५. अष्टावधानी : परात्पर गुरु डॉ. आठवले विषयाशी पूर्ण एकरूप होऊन एकाग्रतेने शिकवत असत, तरीही त्यांचे वर्गातील सर्वांकडे पूर्ण लक्ष असायचे. यातून ‘ते अष्टावधानी आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

३ अ ६. जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे : ते शिकवत असलेल्या विषयाच्या संदर्भात वर्गातील कुणी प्रश्न विचारल्यास ते त्याचे शास्त्राला धरून पूर्णपणे शंकानिरसन करायचे. त्याच वेळी ‘प्रश्न विचारणार्‍यांची जिज्ञासा जागृत राहील’, याकडेही त्यांचे लक्ष असे.

३ अ ७. कुणी अनावश्यक प्रश्न विचारल्यास त्यांना त्यांच्या चुकीची प्रेमाने जाणीव करून देणे : एखाद्याने अनावश्यक किंवा प्रश्न विचारायचा म्हणून विचारल्यास ते त्यांना प्रेमाने त्यांच्या चुकीची जाणीव करून देत. विचारलेला प्रश्न त्यांच्या वैयक्तिक साधनेला पूरक नसल्यास किंवा कुणी केवळ पांडित्य म्हणून प्रश्न विचारल्यास ते ‘इतरांचा वेळ जाऊ नये किंवा विषयांतर होऊ नये’, यासाठी त्या प्रश्नाला प्रेमाने आणि कौशल्याने बगल देत. त्यातून ‘अन्य कुणी असे करू नये’, याची ती पूर्वसूचनाच असायची.

३ अ ८. प्रश्न विचारणार्‍यांना ‘व्यवस्थित समजेल’, अशा पद्धतीने प्रेमाने उत्तरे देणे : ‘प्रश्न विचारणार्‍यांना उत्तर व्यवस्थित समजेल’, अशा प्रकारे ते त्यांच्या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे देत. त्याच वेळी त्या उत्तरातून ते त्यांना साधनेची पुढील दिशाही देत. त्यात ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती जलद व्हावी’, असा त्यांचा उद्देश असायचा.’

– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे), (सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)

(क्रमशः)