मालदीवच्या मुइज्जू सरकारचा तुर्कीयेसमवेत ड्रोन करार !

मालदीव आणि तुर्कीये यांचे राष्ट्रपती

माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याला १५ मार्चपर्यंत माघारी बोलावण्यास भारताला सांगितले आहे. त्याचबरोबर भारताला धमकावण्यासाठी मालदीव सरकार एकामागून एक भारतविरोधी देशांशी त्याचे संबंध दृढ करण्यात व्यस्त आहे. चीनसमवेत अनेक करार केल्यानंतर मुइज्जू सरकार आता तुर्कीयेसोबत घातक ड्रोन करार करत आहे. मुइज्जू सरकारने तुर्कीये कंपनी ‘बायकर’सोबत ३ कोटी ७० लाख डॉलर (३०७ कोटी रुपयांहून अधिक) किमतीचा करार केला आहे. तुर्कीयेच्या या ड्रोनने आर्मेनियापासून युक्रेनपर्यंतच्या युद्धात कहर केला आहे. पाकिस्तानही या ड्रोनचा वापर करतो.

यापूर्वी भारताने मालदीवच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉर्नियर विमाने आणि हेलिकॉप्टर दिली होती. या विमानांची दुरुस्ती करण्यासाठी भारतीय सैन्यदलाच्या तांत्रिक पथकाचा वापर केला जात होता. मुइज्जू सरकारने भारतीय सैन्याला १५ मार्चपर्यंत देश सोडण्यास सांगितले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी मुइज्जू सरकारने तुर्कीयेशी हातमिळवणी केली आहे.