Anand Ranganathan : ‘द टेलिग्राफ’ आणि अन्य प्रसारमाध्यमे ‘दीदी मिडिया’ची भूमिका बजावत आहे !

शास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. आनंद रंगनाथन् यांनी सुनावले खडे बोल ! 

(बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘दीदी’ संबोधले जाते. त्यामुळे त्यांना चुचकारणार्‍या प्रसारमाध्यमांना ‘दीदी मिडिया’ म्हटले आहे.)

शास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. आनंद रंगनाथन्

कोलकाता – शास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. आनंद रंगनाथन् यांना ‘द टेलिग्राफ’ या वृत्तसंस्थेने शहरात आयोजित केलेल्या चर्चासत्राला बोलावले होते. त्या वेळी रंगनाथन् यांनी ‘द टेलिग्राफ’ आणि अन्य प्रसारमाध्यमे यांचा समाचार घेत त्यांना ‘दीदी मिडिया’ संबोधले. ते म्हणाले की, ‘द टेलिग्राफ’ आणि अन्य प्रसारमाध्यमे केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात पुष्कळ लिहितात; मात्र बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारच्या गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करणे, हा त्यांचा स्वभाव बनला आहे. या वेळी ‘द टेलिग्राफ’च्या आयोजकांनी रंगनाथन् यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला; मात्र रंगनाथन् यांनी उपस्थित  श्रोत्यांना ‘मला ३० सेकंद बोलण्यासाठी मिळू शकतात का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे ‘हो’ म्हटले. आनंद रंगनाथन् म्हणाले की, ‘दीदी मीडिया’च्या चर्चेविना विषय अपूर्णच राहील.’ रंगनाथन यांनी हे सांगताच प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘या चर्चासत्राचे आयोजन केलेल्या वृत्तपत्राने या सर्व प्रश्‍नांवर पत्रकारांनी मौन बाळगावे आणि बोलू नये’, या उद्देशाने चर्चेचे आयोजन केले आहे, असे उघडपणे सांगत रंगनाथन् यांनी ‘द टेलिग्राफ’वर टीका केली.

रंगनाथन् पुढे म्हणाले…

१. गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारशी निगडित कोणतेही अनुचित वृत्त आले की, मौन बाळगण्याची कला इथल्या प्रसारमाध्यमांनी आत्मसात केली आहे किंवा वृत्तपत्राच्या २० व्या पानावर कुठेतरी कोपर्‍यात अशा बातम्या छापून त्या दाबल्या जात आहेत.

२. बंगालमध्ये एका प्राध्यापकाने सरकारच्या विरोधात व्यंगचित्र प्रसारित केल्यावर त्याला थप्पड मारण्यात आली आणि अटक करण्यात आली.

३. मध्यरात्री एका पत्रकाराला उचलून कारागृहात टाकले गेले.

४. खून, जाळपोळ आणि लूटमार करून येथील २० सहस्र पंचायतींच्या जागांवर विरोधी पक्षांच्या उमेदवारांना उभे रहाण्यापासून रोखले गेले. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मतपेटींशी छेडछाड करत असल्याचे जनतेने पाहिले आहे.

५. उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, राज्यात निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या ६० टक्के प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवले गेले नाहीत.

६. राज्यात धमक्यांच्या भीतीने न्यायाधीश खटल्यांची सुनावणी करणे टाळतात.

७. तृणमूल काँग्रेसशी संबंधित लोकांच्या घरातून ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

प्रसारमाध्यमांवर आसूड ओढून रोखठोक स्वतःची मते मांडणारे डॉ. रंगनाथन् यांचे अभिनंदन !