eSanjeevani : केंद्र सरकारच्या ‘ई-संजीवनी’ या संकेतस्थळाचा आतापर्यंत १० कोटी लोकांनी घेतला लाभ !

‘ई-संजीवनी’ संकेतस्थळावरून रुग्णांना मिळतो डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला !

मुंबई – केंद्र सरकारच्या ‘ई-संजीवनी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती आधुनिक वैद्यांकडून (डॉक्टरांकडून) कोणत्याही आजारावर विनामूल्य सल्ला घेऊ शकते. तसेच औषधांसाठीचे प्रिस्क्रिप्शन  (औषधांसाठीची चिठ्ठी) मिळवू शकते. हे संकेतस्थळ केंद्र सरकारने वर्ष २०१९ मध्येच चालू केले आहे. त्याचा आतापर्यंत १० कोटींहून अधिक लोकांना लाभ घेतला आहे. हे संकेतस्थळ ‘सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग’ (सीडॅक) या विभागाने बनवला आहे. कोरोना महामारीच्या काळात हे संकेतस्थळ चालू करण्यात आले होते. या काळात बहुतांश नागरिक हे घरीच अलगीकरणात (क्वारंटाईन) होते. त्यामुळे लोकांना घरबसल्या डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला घेता यावा, या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली.

कसा घ्यावा सल्ला ?

या संकेतस्थळाचा वापर करण्यासाठी आधी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी लागणार आहे. याची प्रक्रिया सोपी आहे. यासाठी या संकेतस्थळावर असणार्‍या ‘पेशंट रजिस्ट्रेशन’ पर्यायावर क्लिक करावे लागते. यानंतर स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक लिहून ‘सेंड ओटीपी’वर क्लिक केल्यानंतर भ्रमणभाषवर आलेला ओटीपी यावर टंकलिखित करावा लागतो.

यानंतर विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर लघुसंदेशाद्वारे रुग्णाचे ओळखपत्र (आयडी) आणि टोकन क्रमांक मिळतो. यानंतर पुन्हा मुख्य पृष्ठावर (होम पेजवर) येऊन तेथे टोकन क्रमांकांच्या साहाय्याने ‘लॉग-इन’ करावे लागते. यानंतर काही क्षण प्रतीक्षा केल्यानंतर  ‘कॉल नाऊ’ हा पर्याय दिसेल. यावरून डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो आणि त्यांना समस्या सांगता येऊ शकतात. डॉक्टरांशी बोलणे झाल्यानंतर प्रिस्क्रिप्शन मिळते.

अ‍ॅपही उपलब्ध !

ई-संजीवनी सेवेसाठी भ्रमणभाषवर अ‍ॅपचाही वापर करता येऊ शकतो. प्ले स्टोअरवर eSanjeevani-MoHFW नावाचे अ‍ॅप उपलब्ध आहे.