पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे पुणे येथील रहात्या घरी निधन झाले आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. १३ जानेवारीच्या पहाटे झोपेत असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. अत्रे या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध गायिका होत्या. अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर म्हणाले की, प्रभाताई यांचा आवाज हा वेगळाच होता; म्हणून त्यांच्या गायनाची छाप अनेकांवर पडली. माझी पिढी, माझ्या आधीची पिढी आणि नंतरची पिढी अशा तीनही पिढ्यांवर डॉ. प्रभा अत्रे यांच्या गाण्याची छाप आहे. त्यांचे गाणे आणि बोलणे दोन्ही सुरेलच होते.