परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात निपाणी (कर्नाटक) येथील श्री. अशोक केरबा हावळ (वय ६२ वर्षे) यांनी मोकळे केलेले स्वतःचे मन !

‘साधनेची ओढ असलेल्या मुलांशी कसे वागावे ?’, याचा आदर्श साधनेला विरोध करणार्‍या समाजातील आई-वडिलांसमोर ठेवणारे निपाणी (कर्नाटक) येथील श्री. अशोक हावळ !

‘हल्ली समाजातील बहुसंख्य आई-वडील आपल्या मुलांना साधना करण्यास, तसेच आश्रमात जाऊन रहाण्यास विरोध करतात. ‘मुलांनी पैसे कमवावेत आणि आई-वडिलांना सांभाळावे’, अशी त्यांची अपेक्षा असते. ‘साधनेची ओढ असलेल्या मुलांशी त्यांनी कसे वागले पाहिजे ?’, याचे उदाहरण निपाणी (कर्नाटक) येथील श्री. अशोक केरबा हावळ यांच्या या लेखात अभ्यासायला मिळेल. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

(महर्षींच्या आज्ञेनुसार आता डॉ. जयंत आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावतात.)

एकदा मी (श्री. अमित हावळ), माझे वडील (श्री. अशोक केरबा हावळ, वय ६२ वर्षे) आणि माझी आई (सौ. अनिता अशोक हावळ, वय ५४ वर्षे) या आम्हा हावळ कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी वडिलांचे परात्पर गुरुदेवांशी जे बोलणे झाले, त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

 

श्री. अशोक हावळ

१. मनमोकळेपणाने बोलत असल्याने प्रकृती चांगली असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही पुष्कळ तरुण दिसता !

बाबा (श्री. अशोक केरबा हावळ) : मी कोणतीही गोष्ट मनात लपवत नाही. मनमोकळेपणाने बोलून टाकतो. त्यामुळे माझी प्रकृती चांगली आहे आणि माझे वय दिसून येत नाही.

२. श्री. अशोक केरबा हावळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितलेली सूत्रे

२ अ. मुलाने साधना करण्यासंदर्भात ठेवलेला दृष्टीकाेन

२ अ १. ‘आजपर्यंत आम्ही जे मुलाला देऊ शकलो नाही, ते तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) त्याला दिलेत.

२ अ २. मुलाने गावी गेल्यावरही सेवाच करणे आणि त्याचे दुःख आई-वडिलांना न वाटणे : तो (श्री. अमित हावळ) दुसर्‍याची सेवा करतो. त्यामुळे त्याने केलेल्या सेवेचे फळ आणि आशीर्वाद आम्हाला मिळतात. तो आमची सेवा न करता दुसर्‍यांची सेवा करतो, याचे आम्हाला दुःख वाटत नाही.

२ अ ३. चांगले कर्म केल्यामुळे मुलाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करायला मिळणे : जी व्यक्ती जसे कर्म करते, तसे तिला चांगले-वाईट शारीरिक भोग भोगावे लागतात. मी आजपर्यंत जे देवधर्म केले, त्याचे चांगले फळ म्हणून मला हा मुलगा मिळाला आणि त्याला तुमची सेवा करायला मिळाली.

सौ. अनिता हावळ

२ अ ४. ‘मुलाला आई-वडिलांची सेवा करावी लागू नये’, अशी देवाला प्रार्थना करणे : ‘श्रावण बाळाने त्याच्या आई-वडिलांची सेवा केल्यामुळे आपण त्याला मानतो; परंतु आमच्या मुलाला आई-वडिलांची सेवा करायची वेळच येऊ नये’, अशी माझी देवाला प्रार्थना होत असते.

२ अ ५. ज्या कार्यासाठी जिवाचा जन्म झाला आहे, तो तेच कार्य करण्यापुरते जीवन जगत असल्याने मुलाला साधना करण्यापासून न अडवणे : जीव जन्माला येतांना तो ज्या कार्यासाठी जन्माला आला आहे, ते कार्य पूर्ण करण्यापुरतेच तो त्याचे जीवन जगतो, उदा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इत्यादी संत. त्यामुळे आपण त्यामध्ये काहीच हस्तक्षेप करू शकत नाही; म्हणून आम्ही आमच्या मुलाला अडवले नाही.

२ आ. वडील नियमित करत असलेली उपासना

२ आ १. देवदर्शनानंतरच कोणत्याही कामाला आरंभ करणे : वयाच्या बाराव्या वर्षापासून मी पूजा केल्याविना पोटात अन्न घेत नव्हतो. त्यानंतर गावातील सर्व मंदिरांचे दर्शन घेतल्याविना मी कोणतेही काम चालू करत नव्हतो.

२ आ २. एखादी गोष्ट मनापासून केल्यावरच तिचे फळ मिळणे : मुलगा म्हणतो, ‘‘काही करू नका. केवळ नामजप करा. तुम्हाला सर्व काही मिळेल.’’ मी पूर्वीपासून देवपूजा करतो. त्यामुळे मी पूजा करणे सोडून दिले नाही; पण पूजा झाल्यावर नामजप करतो. एखादी गोष्ट मनापासून केली, तरच तिचे फळ मिळते, मग ते थोडे का असेना !

२ आ ३. शारीरिक प्रकृती चांगली ठेवण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करणे : देवपूजा करतांना मी देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो, ‘माझी शारीरिक प्रकृती चांगली ठेव; कारण माझी सेवा कुणाला करायला लागू नये. माझ्यावर पुष्कळ दायित्व आहे. मला सर्वांना सांभाळायचे आहे. त्यामुळे माझी प्रकृती चांगली ठेव.’

२ इ. उपासना करतांना येणार्‍या त्रासदायक अनुभूती

२ इ १. नामजप करतांना वाईट शक्तीने विविध प्रकारचे त्रास देणे : नामजप करतांना मला शुक्रवार आणि मंगळवार या दिवशी पुष्कळ त्रास होतो, उदा. शरिराला विजेचा झटका बसल्यासारखा होऊन अंगभर मुंग्या येणे, अस्वस्थ वाटून घाम येणे इत्यादी. ‘नामजप करतांना माझ्या मागे कुणीतरी उभे आहे आणि मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे’, असा भास मला नेहमी होतो. ‘तुला काय करायचे आहे ते तू कर; पण मी नामजप करणारच !’, असे मी त्या त्रास देणार्‍या वाईट शक्तीला उद्देशून बोलतो.

श्री. अमित हावळ

२ इ २. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना पुष्कळ त्रास होणे : मला प्रत्येक मासाच्या अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना पुष्कळ त्रास होतो. त्या काळात घरी कुणाशीही पटत नाही. त्यांच्यावर चिडचिड होते. पूजा करतांना मधे मधे कोणी बोलले, तर पुष्कळ त्रास होऊन चिडचिड होते.

२ ई. मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी करत असलेले प्रयत्न

२ ई १. माझ्या मनात जे काही येते, ते मी मनमोकळेपणाने बोलून माझे मन रिकामे करून टाकतो.

२ ई २. मनमोकळेपणाने बोलल्याने प्रकृती चांगली रहाणे : मनातील गोष्टी, दुःख, काळजी इत्यादी वेळच्या वेळी बोलून मन रिकामे करावे, नाहीतर शरिरात विष निर्माण होऊन प्रकृती खालावते. मग भले लोक मला खुळा का समजेत ना ! किंवा ‘हा पुष्कळ बडबडतो’, असे म्हणेत ना ! मला त्याचे काही वाटत नाही. त्यामुळे माझी प्रकृती चांगली आहे.

२ उ. मनुष्याचे जीवन घड्याळासारखे असल्याचे सांगणे : घड्याळाकडे पाहिल्यावर मनुष्याचे जीवन घड्याळासारखे वाटते; कारण घड्याळातले दोन्ही मोठे काटे मंद गतीने हलत असतात. तसेच मनुष्याचे जीवन असते; पण सेकंद काटा सतत फिरत असतो. तसे मनुष्याच्या मनात असंख्य विचार येत असतात, म्हणजेच मन सेकंद काट्यासारखे चंचल असते; पण इतर जे दोन काटे आहेत, तेच मनुष्याचे जीवन जगणे होय.

२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सहजता आणि त्यांना सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतांना पाहून त्यांच्याशी बोलण्याची शक्ती निर्माण होणे : माझी कोणत्यातरी जन्माची पुण्याई; म्हणून मला तुमचे (गुरूदेवांचे) दर्शन झाले. तुमच्याशी इतके मनमोकळेपणाने बोलू शकलो; म्हणून पुष्कळ आनंद वाटला. इतके सर्व विषय मी तुमच्याशी बोलेन, हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. इथे सत्संगात बसल्यावर तुमची सहजता आणि तुम्हाला सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतांना पाहून माझ्यात तुमच्याशी बोलण्याची शक्ती निर्माण झाली; म्हणून मी तुमच्याशी बोलू शकलो. फार काही बोललो असेल, तर क्षमा करा.’

३. श्री. अशोक हावळ यांनी आश्रमातून घरी जातांना दिलेला अभिप्राय !

आश्रमात दोन दिवस राहून घरी निघतांना वडिलांनी अभिप्राय दिला, ‘समाजातील मुलांना ‘हे माझे आई-वडील आहेत’, असे सांगतांना लाज वाटते; पण माझ्या मुलाने इकडे सर्वांना (साधकांना) ‘हे माझे आई-बाबा आहेत’, अशी ओळख करून दिली. सर्वजण आमच्याशी फार आपुलकीने बोलले. हा सर्व मान मी माझ्या मुलामुळे मिळवला, याचा मला पुष्कळ अभिमान वाटतो.’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचा स्पर्श केलेले पाकिट मुलाने सांगितल्याप्रमाणे देवघरात जपून ठेवून त्याला नियमित गंध लावणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामध्ये बाबांनी त्यांच्या जवळील पाकीट त्यांच्या चरणी ठेवून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. बाबांनी ते पाकीट प.पू. डॉक्टरांच्या चरणी ठेवले होते; म्हणून मी बाबांना सांगितले, ‘‘बाबा, हे पाकीट जिवापाड जपा. कधी काही अडचण आली, त्रास होऊ लागला की, या पाकिटाकडे पाहून गुरुदेवांचे स्मरण करा. तुमचे सर्व त्रास दूर होतील.’’ त्यावर बाबांनी ‘हो’ म्हटले. त्यांनी ते पाकीट एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून देवघरात एका खिळ्याला अडकवले आहे आणि त्याला पूजेच्या वेळी नियमित गंध लावतात.’

– गुरुमाऊली आपला चरण सेवक,

श्री. अमित अशोक हावळ (श्री. अशोक हावळ यांचा मुलगा), निपाणी, कर्नाटक.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक