मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रेविषयी निर्णय देणार आहेत आणि मुख्यमंत्री हे त्यातीलच एक आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या दृष्टीने आरोपीच आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीला भेटणे होय, असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आमदार उद्धव ठाकरे यांनी ९ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील, तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची ? यांची मिलिभगत आहे का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट यांनी ‘२ मासांत ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्यात २ वर्षे काढली आहेत’, असे म्हटले आहे. ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणे चालू आहे त्यामुळे लोकशाहीची हत्या होत आहे का ? अशी आता शंका निर्माण झाली आहे. न्यायमूर्ती म्हटल्यावर रामशास्त्री प्रभुणे यांचे नाव आपल्यापुढे येते. त्या वेळी त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निवाडा केला होता. आमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश होते त्यात वेळकाढूपणा करण्यात आला आहे. १० जानेवारीच्या सुनावणीतही वेळकाढूपणा केला जाईल. पुढची तारीख मिळेपर्यंत निवडणुका होऊन जातील.’’
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याविषयी म्हणाले की, माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ही पूर्वनियोजित भेट आता घेतली.