India Competes China : (म्हणे) ‘भारताने चीनशी स्पर्धा करतांना शेजारील देशांशी संबंध बिघडवले आणि आता त्याचे खापर चीनवर फोडू नये !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

 मालदीव प्रकरणावरून चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मधून भारतावर टीका !

बीजिंग (चीन) – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा ‘चीन समर्थक’ असा उल्लेख करणे, हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्‍वासाची कमतरता दर्शवते. चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने त्याच्या शेजारी देशांसमवेतचे संबंध बिघडवले. आता त्याचे खापर चीनवर फोडू नये, अशी टीका चीन सरकारचे मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाइम्स’ने केली आहे. सध्या मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू चीनच्या दौर्‍यावर आहेत. ‘चीनने कधीही मालदीवला भारतापासून दूर रहाण्यास सांगितलेले नाही, तसेच ‘भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध, म्हणजे चीनसाठी धोका’, या दृष्टीने पहात नाही’, असा दावाही ‘ग्लोबल टाइम्स’ने केला आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ने पुढे म्हटले आहे की,

१. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन आणि भारत यांची बाजू घेत नाही. त्यांना तसे करण्याचीही आवश्यकता नाही, किंबहुना ते त्यांच्या देशाच्या हिताला प्राधान्य देत आहेत. मुइज्जू यांना चीनचे समर्थक मानून भारत त्यांच्यावर दबाव आणू इच्छितो.

२. चीन हा भारत आणि मालदीव यांच्यासमवेत त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने आणि उदार होऊन विचार केला पाहिजे. ‘आपला प्रभाव या प्रदेशात कायम रहावा’, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांना चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याचा भारताने विचार करायला हवा.

संपादकीय भूमिका 

‘भारताचे नाही, तर चीनचेच त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले आहेत. चीनला एकही मित्र देश नाही, हे जगाला ठाऊक आहे. चीनची ज्यांच्याशी जवळीक आहे, ती केवळ स्वार्थासाठी आहे, हे उघड सत्य आहे. त्यामुळे चीनने भारताकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडेच आधी पहावे’, असे भारताने त्याला ठणकावून सांगितले पाहिजे ‘