गुन्हा घडलेल्या ‘लॉज’चा परवाना रहित करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप

आटपाडी (जिल्हा सांगली) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण !

साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्याशी चर्चा करतांना अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे (उजवीकडून पहिल्या- पोलिसांच्या बाजूने)

आटपाडी (जिल्हा सांगली) – सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ३ शाळकरी अल्पवयीन मुलींच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पीडित कुटुंबियांची भेट घेतली. ही घटना ज्या ‘लॉज’वर झाली त्या ‘लॉज’च्या मालकावर गुन्हा नोंद करावा, तसेच त्या ‘लॉज’चा परवाना रहित करावा, अशी मागणी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केली.

या संदर्भात अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या, ‘‘आटपाडी येथील प्रकरणाने सांगली जिल्हा हादरला असून शाळेतील मुलींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या मुलींना फूस लावून फिरायला आणि जेवायला नेण्याच्या बहाण्याने त्या त्यांच्यावर ‘लॉज’मध्ये बलात्कार करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपींना अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत.’’ या वेळी आटपाडीतील भाजप महिला मोर्चा आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.